चंद्रपूर: चंद्रपूर दुष्काळ उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने जलसंधारण आणि रोजगाराचा व्यापक आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या नेतृत्वाखाली कामांना गती देण्यात येत आहे. चालू खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला तातडीने काम देण्यासोबतच, भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात जलसंधारण, सिंचन क्षमता वाढवणे, वृक्षलागवड आणि चारा निर्मितीसारख्या कामांना गती देण्यात येत असून, ‘विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान (व्हीबीजी-राम-जी)’ अंतर्गत तब्बल २८ हजार ६८८ विविध विकासकामांचे नियोजन आखण्यात आले आहे. (दुष्काळ उपाययोजनांसाठी आमदार मुनगंटीवार यांची बैठक, वाचा हि बातमी)
चंद्रपूर दुष्काळ उपाययोजना: २८,६८८ कामांचे नियोजन
ग्रामीण भागातील पाणीसाठा वाढवण्यासाठी आणि शेतीला संजीवनी देण्यासाठी सन २०२६-२७ च्या आराखड्यात जलसंधारणाच्या कामांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये ८९९ मामा तलावांचे खोलीकरण, १६२० बोडी खोलीकरण, २३७५ नाला खोलीकरण आणि २४३८ शेततळ्यांच्या कामांचा समावेश आहे. तसेच ८३४ बंधाऱ्यांचे बांधकाम व गाळ काढणे, १६ हजार ३५६ सिंचन विहिरी, १८९ रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ६२ सलग समतल चरांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी २४५६ वृक्ष लागवड, ७१२ फुलशेती आणि ७४७ गवत लागवडीची कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांमुळे जिल्ह्यातील भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
८२,५०० जलतारा आणि वृक्षलागवड मोहीम
जिल्ह्यातील भूजलाचे पुनर्भरण करण्यासाठी प्रशासनाने ८२५ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी १०० याप्रमाणे तब्बल ८२ हजार ५०० ‘जलतारा’ निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘युक्तधारा’ प्रणालीद्वारे आतापर्यंत १७ हजार ५४१ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जिल्हा खनिज विकास निधीच्या सहकार्याने विशेष वृक्षलागवड मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत ४५ ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वस्तिक पॅटर्न’नुसार तर ५१ ग्रामपंचायतींमध्ये फळबाग लागवडीच्या माध्यमातून एकूण ६६ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे, ज्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे.
दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागातील एकाही मजुराला रोजगाराशिवाय राहावे लागू नये यासाठी प्रशासनाने १० हजार २३७ कामांचा शेल्फ तयार ठेवला आहे. सध्या जिल्ह्यात १४९५ विविध कामे प्रत्यक्ष सुरू असून, त्यावर ३ हजार ९५७ मजूर काम करत आहेत. हा उपक्रम केवळ तात्पुरता रोजगार देण्यापुरता मर्यादित नसून, भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, शेतीची उत्पादकता वाढवणे आणि सिंचन व्यवस्था भक्कम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपजिल्हाधिकारी (मनरेगा) शुभम दांडेकर यांनी व्यक्त केला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “चंद्रपूर दुष्काळ उपाययोजना: जलसंधारण आणि रोजगारासाठी २८,६८८ कामांचा आराखडा”