चंद्रपूर : मुनगंटीवार सिंचन आढावा बैठक १५ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयात झाली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आसोलामेंढा आणि गोसेखुर्द प्रकल्पांतील सिंचन समस्यांचा आढावा घेतला. (ललित कासट परिवाराकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत, वाचा बातमी)
शेतीच्या समृद्धीचा मार्ग सिंचनातून जातो, याची जाणीव ठेवून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आसोलामेंढा व गोसेखुर्द प्रकल्पांशी संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांच्या निराकरणासाठी पुढाकार घेतला आहे. कालव्यांची अपूर्ण कामे, पाइपलाइनमधील गळती, अपुरा पाणीपुरवठा आणि सिंचन सुविधांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
मुनगंटीवार सिंचन आढावा बैठक : काय ठरले?
शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, त्यांच्या पिकांना पाण्याअभावी नुकसान सोसावे लागू नये आणि सिंचनाच्या पुरेशा सुविधांमुळे शेतीला नवी उभारी मिळावी, या संवेदनशील भूमिकेतून संपूर्ण बल्लारपूर मतदारसंघ सिंचनसुविधांनी समृद्ध करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून सिंचनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दि. १५ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयात ही आढावा बैठक पार पडली.
बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी येत्या आठ दिवसांत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर विस्तृत बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्यासोबत बैठक घेऊन जलसंधारणाच्या कामांचा दीर्घकालीन कार्यक्रम आखण्याचे निर्देश दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा संदर्भ देताना आ.मुनगंटीवार यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा प्रभावी लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी निधी आणि जलसंधारणाची कामे यांना गती देता येते. त्यासाठी स्वतंत्र पाठपुरावा यंत्रणा उभारून शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या संधींचा पुरेपूर उपयोग करावा, असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून SB4 जंक्शन लाईनद्वारे आठ गावांतील शेतीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. या जंक्शन लाईनचे पाणी एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या हस्ते सोडण्यात यावे, अशी भावना व्यक्त करताना, गरीब शेतकऱ्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब हा रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीतील संपत्तीइतकाच अनमोल असतो, ही जाणीव त्यांनी अधोरेखित केली. शेतकऱ्यांच्या कष्टांना पाण्याची साथ मिळावी आणि त्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि आढावा बैठकीनंतर २० ऑक्टोबर रोजी जंक्शन लाईनला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे राजोली, चिखली, गांगलवाडी, डोंगरगाव, चिटकी, लोणखैरी, नवेगाव (लोन) आणि बेंदेवाही या आठ गावांतील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
पुढील तीन वर्षांसाठी सिंचनाचा व्यापक आराखडा
पोंभुर्णा, मूल, बल्लारपूर आणि चंद्रपूर या चार तालुक्यांतील सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची यादी तयार करून, सिंचन, जलसंधारण आणि वैयक्तिक सिंचन योजनांच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत सिंचन सुविधांचा विस्तार करण्याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. संपूर्ण मतदारसंघ सिंचनयुक्त करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा, वैयक्तिक सिंचनासाठी वनविभागाच्या CAMPA निधीची शक्यता तपासावी, तसेच ह्युमन प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील काही भागांसाठी नवीन योजनेतून पर्यायी व्यवस्था करण्याबाबत विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
कालव्यांची अपूर्ण कामे आणि गळती तातडीने दूर करा
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आसोलामेंढा व गोसेखुर्द प्रकल्पांतील सिंचन समस्यांचा आढावा घेताना कालव्यांची अपूर्ण कामे, अपुरा पाणीपुरवठा आणि पाइपलाइनमधील गळती यांसारखे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले. आसोलामेंढा प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची क्षमता ६५ क्युमेक्स असताना प्रत्यक्षात ४२ क्युमेक्स पाणी सोडले जात असल्याने सिंचनावर मर्यादा येत असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. पोंभुर्णा तालुक्यातील पाइपलाइन गळती, तसेच मूल तालुक्यातील जानाळा, सुशी दाबगाव, केळझर आणि वेळवा येथील सिंचनाच्या समस्यांवरही चर्चा झाली. वेळवा येथे पाण्याअभावी धानपिकाचे नुकसान होत असून, तलावाच्या खोलीकरणाचा प्रश्नही प्रलंबित असल्याचे बैठकीत मांडण्यात आले.
शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठीही स्पष्ट निर्देश
कालव्यांतील गळती दुरुस्त करताना शेतपिकांचे नुकसान झाल्यास संबंधित विभागाने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, तसेच सिंचनासाठी आवश्यक वीज उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी स्थानिक, नागपूर व मुंबई स्तरावर तातडीने पत्रव्यवहार करून संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विषय मांडण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सिंचनाच्या प्रश्नांचे कालबद्ध निराकरण करून उपलब्ध जलस्रोतांचा योग्य उपयोग करत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






