चंद्रपूर: चंद्रपूर मोटर सायकल चोर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा पथकाने दोघांना अटक केली. रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी गस्तीदरम्यान मूल रोडवरील वेकोलि परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींकडून चोरीची पल्सर आणि एक मोपेड जप्त करण्यात आली. त्यांची किंमत एकूण १ लाख २५ हजार रुपये आहे. वरोरा पोलीस ठाण्यातील एक गुन्हा यामुळे उघडकीस आला. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. (ट्रॅव्हल्स मधून दारू तस्करी, २, महिलांना अटक, वाचा बातमी)
शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा पथकाने गस्तीदरम्यान मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर शहरातील मूल रोड परिसराबाहेरून दोन सराईत मोटर सायकल चोरांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून चोरीची पल्सर गाडी व गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले आहेत.
चंद्रपूर मोटर सायकल चोर : मूल रोडवर काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या वरोरा पथकाचे अधिकारी व अंमलदार चंद्रपूर शहरासह परिसरात पेट्रोलिंग करीत गस्त घालीत होते. यादरम्यान मूल रोडवरील वेकोलि पंखा परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यावरून पोलिसांनी तत्परता दाखवत दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दुचाकी चोरीची बरीच प्रकरणे उघडकीस आणली. पोलीस तपासात वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला असून, या प्रकरणी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेली सुमारे ७५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर एन एस १२५ (क्र. एमएच ३४ सीएफ ३९९३) ही मोटार सायकल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५० हजार रुपये किमतीची हिरो होंडा ऍक्टिव्हा मोपेड (क्र. एमएच ३४ सीयू १२८२) अशी एकूण १ लाख २५ हजार रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या प्रकरणी लॉरेंसे उर्फ इशू जॉर्ज दास (वय २१ वर्षे, रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर) आणि निखिल उर्फ बिसलरी रामराकेश निषाद (वय १९ वर्षे, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तसेच या गुन्ह्यातील आणखी एक पाहिजे असलेला आरोपी लवकुश उर्फ डू उमेश निषाद (वय २४ वर्षे, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर) याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे.
ही यशस्वी कारवाई उपविभाग वरोरा अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने पार पाडली असून, शहरातील चोरीच्या इतर गुन्ह्यांचाही पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






