ASI Illegal Construction Chandrapur गोल बाजार महादेव मंदिर परिसरात व्यापाऱ्यावर गुन्हा

चंद्रपूर गोल बाजारात पुरातत्व विभागाचा दणका; मंदिराच्या संरक्षित क्षेत्रात नियमबाह्य बांधकाम, व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 11, 2026

चंद्रपूर: ASI Illegal Construction Chandrapur प्रकरणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गोल बाजारातील ऐतिहासिक महादेव मंदिराच्या संरक्षित क्षेत्रात हे बांधकाम सुरू होते. सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात येत होते. पुरातत्व विभागाने वारंवार नोटिसा देऊनही काम थांबवण्यात आले नाही.

अखेर पुरातत्व अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (हे हि वाचा – घरात घुसुन महिलेला शिवीगाळ आणि चोरी)

ASI Illegal Construction Chandrapur प्रकरणात व्यापाऱ्यावर गुन्हा

शहरातील ऐतिहासिक वारसास्थळांच्या जतन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने कठोर पावले उचलली असून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोल बाजार परिसरातील ऐतिहासिक महादेव (मुरलीमनोहर) मंदिराच्या केंद्रीय संरक्षित व विनियमित क्षेत्रात कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता नियमबाह्य बांधकाम केल्याप्रकरणी देशबंधू साडी सेंटरचे मोनिष शंभुनाथ केवलरामानी यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वारंवार नोटीस बजावूनही बांधकाम सुरूच ठेवल्याने प्रशासनाने ही थेट फौजदारी कारवाई केली असून यामुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

प्राचीन महादेव (मुरलीमनोहर) मंदिराच्या १०० व २०० मीटर परिघातील नियम काय सांगतो?

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण उपमंडळ चंद्रपूरचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक शुभम रामदास कोरे यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीनुसार, चंद्रपुरातील प्राचीन महादेव (मुरलीमनोहर) मंदिर हे भारत सरकारच्या ११ एप्रिल १९२५ च्या अधिसूचनेनुसार केंद्रीय संरक्षित व राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्राचीन संस्मारक आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम १९५८ (सुधारित २०१०) मधील कायदेशीर तरतुदींनुसार, संरक्षित स्मारकाच्या सीमेपासून १०० मीटरचा परिसर हा ‘प्रतिषिद्ध क्षेत्र’ (Prohibited Area) तर त्यापुढील २०० मीटरपर्यंतचा परिसर हा ‘विनियमित क्षेत्र’ (Regulated Area) म्हणून घोषित आहे. या नियमावलीनुसार सदर क्षेत्रात सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे उत्खनन किंवा नवीन बांधकाम करण्यास सक्त कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.

असे असतानाही गोल बाजार वॉर्डातील देशबंधू साडी सेंटरचे मोनिष केवलरामानी यांनी या स्मारकापासून अवघ्या १०३ मीटर अंतरावर म्हणजेच विनियमित क्षेत्रात नवीन बांधकामाला सुरुवात केली होती. या बांधकामासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण किंवा राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण (सायन फोर्ट, मुंबई) यांच्याकडून कोणतीही कायदेशीर मंजुरी घेण्यात आलेली नव्हती. हा प्रकार पुरातत्व विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर स्थानिक चंद्रपूर उपमंडळ कार्यालयाने संबंधित व्यक्तीला प्रथम नोटीस दिली, तर पाठोपाठ नागपूर मंडल कार्यालयाकडूनही कायदेशीर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या या सर्व नोटिसांना केराची टोपली दाखवत मोनिष केवलरामानी यांनी बांधकाम थांबवण्याऐवजी ते सुरूच ठेवले.

प्रशासकीय आदेश आणि प्राचीन स्मारक संरक्षण कायद्याचे उघड उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर पुरातत्व विभागाने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी मोनिष शंभुनाथ केवलरामानी याच्याविरुद्ध ‘प्राचीन संस्मारक आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम १९५८ (सुधारित २०१०)’ च्या कलम ३० (बी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार अनधिकृत बांधकाम केल्यास दोन वर्षांपर्यंतचा कारावास अथवा एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार दीपक भास्कर गुरनुले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ऐतिहासिक व राष्ट्रीय वारसास्थळांच्या परिसरात बेकायदेशीर उत्खनन अथवा बांधकाम करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पुरातत्व विभागाकडून देण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment