चंद्रपूर : Chandrapur police Tadipar Action अंतर्गत चंद्रपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. शहर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ५ सराईत गुन्हेगारांना ३ महिन्यांसाठी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. (हे हि वाचा – बॉम्बस्फोट होणार तातडीने मदत पाठवा, पोलिसांची उडाली तारांबळ)
महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५६ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात तीव्र खळबळ उडाली आहे. चंद्रपूर परिसरातील गुन्हेगारांवर आता पोलिसांची कडक नजर असणार आहे.
तडीपार करण्यात आलेल्या ५ सराईत गुन्हेगारांची नावे आणि त्यांची पार्श्वभूमी
तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांमध्ये महावीर नगर भिवापूर वॉर्ड येथील रहिवासी किसन उर्फ अमन महेंद्र डोंगरे (वय २७), बाबूपेठ बाबानगर येथील रहिवासी विशाल पापा तांबे (वय ३०), बिनबा गेटजवळील बिनबा वॉर्ड येथील रहिवासी गणेश राजू बैस (वय २५), बल्लारशाह तालुक्यातील नांदगाव पोडे येथील रहिवासी अनिल हिरामन ठाकूर (वय ४४) आणि प्रकाश नगर महाकाली कॉलरी येथील रहिवासी नरसिंग गट्टू रेवेल्लीवार (वय ५५) या पाच जणांचा समावेश आहे. या पाचही आरोपींवर चोरी, घरफोडी, घातक शस्त्रांनी जबर दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, जुगार खेळणे, तसेच अवैध दारू बाळगून तिची विक्री करणे यांसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.
संबंधित गुन्हेगारांच्या वाढत्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांमुळे चंद्रपूर शहर आणि आसपासच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला होता. त्यांच्या परिसरात असलेल्या प्रचंड दहशतीमुळे सामान्य नागरिक आणि गंभीर प्रकरणांतील साक्षीदार न्यायालयात किंवा पोलिसांसमोर उघडपणे साक्ष देण्यास कमालीचे घाबरत होते. या गुन्हेगारांच्या दहशतीचा अंत करण्यासाठी आणि त्यांच्या कारवायांना वेळीच आळा घालण्यासाठी चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या वतीने महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६ नुसार तडीपारीचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आले होते.
त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी सर्व पुरावे आणि कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी करून या पाचही आरोपींना ३ महिन्यांच्या कालावधीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे अंतिम आदेश जारी केले आहेत. चंद्रपूर जिल्हा पूर्णपणे गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई सतत सुरू राहील तसेच बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले, चंद्रपूर शहरचे पोलीस निरीक्षक श्री. निशीकांत रामटेके तसेच रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सौ. प्रभावती एकुरके यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






