चंद्रपूर / भद्रावती: Bhadravati Scented Tobacco Seized प्रकरणात भद्रावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चंडिका वॉर्डात बेकायदेशीर साठ्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी राहत्या घरातून १८,५२५ रुपयांचा सुगंधी तंबाखू जप्त केला. आरोपी हा छुप्या मार्गाने खर्रे तयार करून विकत होता. याप्रकरणी साकिब शकील शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (हे हि वाचा – मुख्याध्यापकांवर जीवघेणा हल्ला)
भद्रावती शहरात बंदी असलेल्या सुगंधीत तंबाखूची छुप्या मार्गाने विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. चंडिका वॉर्ड, डोलारा तलाव परिसरात राहत्या घरातून खर्रे तयार करण्यासाठी बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला १८ हजार ५२५ रुपये किमतीचा ‘मझा १०८’ कंपनीचा सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhadravati Scented Tobacco Seized : चंडिका वॉर्डात पोलिसांची धडक कारवाई
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, भद्रावती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र खुशालराव बेसरकर हे पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार गोपाल, अनुप, देवानंद, संतोष आणि खुशाल यांच्यासह परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान चंडिका वॉर्ड, डोलारा तलाव येथील साकिब शकील शेख (वय २७) हा आपल्या राहत्या घरात प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूचा बेकायदेशीर साठा करून त्यापासून खर्रे तयार करून विक्री करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांना सोबत घेऊन साकिब शेख याच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता, पहिल्याच खोलीत पांढऱ्या चुगडीमध्ये ठेवलेल्या ६ खोक्यांमध्ये ५० ग्रॅम वजनाचे एकूण ६५ नग ‘मझा १०८’ सुगंधीत तंबाखूचे सीलबंद डब्बे आढळून आले. बाजारातील दरानुसार प्रति डब्बा २८५ रुपये प्रमाणे एकूण १८ हजार ५२५ रुपयांचा हा साठा पोलिसांनी जप्त केला. या साठ्यातून रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए. सॅम्पल) नमुने वेगळे काढून ते पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने आणि अन्न व औषध प्रशासनाने जनहित तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मानवी शरीरास अत्यंत घातक ठरणाऱ्या सुगंधीत तंबाखूच्या विक्री व साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असतानाही आरोपीने नफा मिळविण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बेसरकर यांच्या तक्रारीवरून आरोपी साकिब शकील शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ च्या विविध कलमान्वये भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






