Mul Gold Theft Case Accused Arrested By Chandrapur Police

राजगड येथे नातजावयाने चोरली सोन्याची चैन; किराणा दुकानदार अटकेत तर मुख्य आरोपी फरार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 24, 2026

मूल (चंद्रपूर): Mul Gold Theft Case अंतर्गत मूल पोलिसांनी राजगड येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. नातजावयाने आजीच्या घरातून १२ ग्रॅमची सोन्याची चैन चोरली होती. पोलिसांनी चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या किराणा दुकानदाराला अटक केली आहे. सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Mul Gold Theft Case मध्ये नातजावयाने केला विश्वासघात

डोळ्यांच्या उपचारासाठी गेलेल्या ६७ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या घरातून सुमारे दीड लाख रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेल्याची धक्कादायक घटना मूल तालुक्यातील राजगड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणात घरकाम आणि देखभालीसाठी आलेल्या नातजावयानेच विश्वासघात करत सोन्याची चैन लंपास केल्याचे निष्पन्न झाले असून, चोरीचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या स्थानिक किराणा दुकानदाराला मूल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरीस गेलेली १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात यश मिळवले असून फरार मुख्य आरोपीचा कसून शोध सुरू आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील व्यक्तीने मागवली पिस्तूल)

तक्रारदार श्रीमती वंदना प्रेमानंद सोरते (वय ६७, रा. राजगड, ता. मूल) यांना डाव्या डोळ्याने कमी दिसत असल्याने उपचारासाठी दवाखान्यात जाणे आवश्यक होते. घरातील लहान नात स्नेहा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे नातेवाईकांकडे गेली असल्याने वंदना सोरते यांनी मदतीसाठी आपली मोठी नात रोहिणी आणि तिचा पती तथागत शागीर निमगडे (वय २७, रा. विरई, ता. मूल) यांना घरी बोलावून घेतले होते. त्यामुळे आरोपी तथागत हा आपल्या पत्नीसह फिर्यादीच्या घरीच राहत होता.

डोळ्यांच्या उपचारासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या घरी चोरी

दरम्यान, २६ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता वंदना सोरते या डोळ्यांच्या उपचारासाठी गडचिरोली येथे गेल्या असता, दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास घरी परत आल्यानंतर तथागत याने वडिलांची तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करत पत्नीसह गावी पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या नातीने फोन करून पती तथागत नवी गाडी घेण्यासाठी जात असल्याचे आजीला सांगितले. यावरून संशय बळावल्याने फिर्यादीने घरातील दागिन्यांची डब्बी तपासली असता त्यातील १ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन गायब असल्याचे स्पष्ट झाले. नातजावयानेच घरातून सोन्याची चैन चोरल्याची खात्री पटल्यानंतर वंदना सोरते यांनी मूल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, ज्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३ (३) व ३१७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकाने चंद्रपूर जिल्हा सायबर सेलच्या मदतीने संशयित आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण (SDR/CDR) केले. या तांत्रिक तपासात तथागत निमगडे याचे राजगड येथील किराणा व्यावसायिक प्रदीप तुळशीराम उंदीरवाडे (वय ६१) याच्याशी संभाषण झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने प्रदीप उंदीरवाडे याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने तथागतकडून १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी तथागत निमगडे हा सध्या फरार असून पोलीस पथके त्याचा माग काढत आहेत.

सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि मूलचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश कन्नाके, पोहवा नरेश कोडापे, पोलीस अंमलदार दिलीप आदे, नरेंद्र वाकडे, प्रकाश चिकराम, शंकर बोरसरे व सायबर सेल चंद्रपूर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment