चंद्रपूर / वरोरा: Warora Forest Theft Case प्रकरणी वरोरा वनविभागाच्या आंजणगाव नियत क्षेत्रात मोठी चोरी झाली आहे. केळी गावाजवळील परिसरामध्ये बसवलेले दोन लोखंडी गेट चोरीला गेले आहेत. याशिवाय फेन्सिंगचे तब्बल ६२ सिमेंटचे खांब अज्ञात चोरट्यांनी पळवले. या घटनेमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. वनरक्षक कल्पना पेंदोर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी चौधरी पुढील तपास करत आहेत. (११२ वर कॉल इथे बॉम्बस्फोट होणार, पोलिसांची तारांबळ)
मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा वनविभागातील आंजणगाव नियत क्षेत्रात केळी गावाजवळील गावशेत सर्व्हे क्रमांक १७१ मध्ये सन २०२५-२०२६ मध्ये कॅम्पा (CAMPA) योजनेअंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चैनिंग फेन्सिंगचे काम करण्यात आले होते. या फेन्सिंगला प्रवेशद्वारावर आणि पोतरा नदीलगतच्या बाजूला लोखंडी नटबोल्टच्या सहाय्याने मजबूत लोखंडी गेट बसवण्यात आले होते.
गस्तीदरम्यान वनरक्षकाच्या लक्षात आला प्रकार
वनरक्षक कुमारी कल्पना शंभू पेंदोर (वय ४०, रा. विनायक ले-आउट, टिळक वॉर्ड, वरोरा) या नेहमीप्रमाणे आपल्या बीट क्षेत्रात गस्त घालत असताना १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांनी सदर फेन्सिंग व दोन्ही लोखंडी गेट जागेवर व्यवस्थित असल्याचे पाहिले होते. मात्र, १७ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या पुन्हा गस्तीवर असताना त्यांना फेन्सिंगचे दोन्ही लोखंडी गेट गायब असल्याचे दिसून आले.
दोन लोखंडी गेट आणि ६२ सिमेंट खांब गायब
संशय आल्याने त्यांनी परिसरात पाहणी केली असता, चोरट्यांनी केवळ गेटच नव्हे तर फेन्सिंगसाठी लाईनने लावलेले ६२ सिमेंटचे खांबही मुळासकट उपटून नेल्याचे निष्पन्न झाले. वनरक्षक पेंदोर यांनी तात्काळ आजूबाजूच्या गावातील नागरिकांकडे विचारपूस केली, मात्र चोरट्यांचा कोणताही सुगावा लागला नाही. चोरट्यांनी अंदाजे २२ हजार ६८० रुपये किमतीचे दोन लोखंडी गेट आणि सिमेंटचे खांब चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार वनरक्षक कल्पना पेंदोर यांनी २३ जुलै रोजी वरोरा पोलीस ठाण्यात उपस्थित राहून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश सोंटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी गरीबराम चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वनपरिसरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिमेंटचे खांब उपटून आणि गेट चोरून नेल्याने स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






