चिमूर – Chimur Cable Theft: चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात सिंचन प्रकल्पाची ७,५०० मीटर ॲल्युमिनियम विद्युत केबल चोरीला गेली आहे. कन्हाळगाव ते महालगाव दरम्यान ही घटना घडली. चोरीस गेलेल्या केबलची किंमत अंदाजे ९० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ४ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत ही चोरी झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. (महिलेची सोन्याची पोत चोरीला)
Chimur Cable Theft: कन्हाळगाव-महालगाव मार्गावर काय घडले?
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर परिसरात सिंचन प्रकल्पाच्या कामाला मोठा फटका बसल्याची घटना उघडकीस आली असून, कन्हाळगाव ते महालगाव दरम्यान सुरू असलेल्या प्रकल्पाच्या वीज पुरवठ्याची तब्बल साडेसात हजार मीटर ॲल्युमिनियमची विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे. या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील मारोती नगर, दत्तवाडी येथील रहिवासी असलेले आणि सध्या चिमूर तालुक्यातील महालगाव येथे सीवेट प्रोजेक्ट प्रा. लि. हैदराबाद कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करणारे राजेश भगवान पाठक (वय ४९) यांनी यासंदर्भात चिमूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. विदर्भ सिंचन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम या कंपनीमार्फत सुरू असून, महालगाव येथील बॅलन्सिंग टँकवरील पंप हाऊससाठी सबस्टेशनपासून विद्युत जोडणी करण्याचे काम प्रगतीपथावर होते.
पोल क्रमांक १३ ते १२८ दरम्यानची केबल गायब, Chimur Cable Theft
यादरम्यान ३ नोव्हेंबर रोजी रात्री बारा ते ४ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यानच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत वीजेच्या खांबांवर चढून ही चोरी केली. फिर्यादी राजेश पाठक हे ४ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कन्हाळगाव ते महालगाव दरम्यान गस्तीवर (पेट्रोलिंग) असताना त्यांना वीज पोल क्रमांक १३ ते ४५, ६१ ते ७५ आणि ११६ ते १२८ दरम्यानची ॲल्युमिनियम केबल कापलेली आणि गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या प्रकारची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सागर अचपळ यांना दिली आणि परिसरात शोध घेतला, परंतु चोरट्यांचा व केबलचा कुठेही पत्ता लागला नाही.
Chimur Cable Theft, चिमूरमध्ये सिंचन प्रकल्पाची ७,५०० मीटर केबल चोरीला
खांबांवर चढून पूर्वनियोजित पद्धतीने ही चोरी करण्यात आली असून, यात तब्बल ७,५०० मीटर लांबीची ११ केव्हीए AAA सी केबल चोरीला गेली आहे. चोरीस गेलेल्या या ॲल्युमिनियम विद्युत तारेची बाजारातील किंमत अंदाजे ९० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरािरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोविंदराव चव्हाण करत आहेत. शासकीय सिंचन प्रकल्पांच्या साहित्यावर चोरट्यांनी डोळा ठेवल्यामुळे परिसरातील विकासकामांना मोठा सुरुंग लागला असून, पोलीस या अज्ञात चोरांचा कसून शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







