चंद्रपूर – Chandrapur Missing Girl Case मुळे संपूर्ण चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर येथील एमआयडीसी पडोली परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी मूळची राजस्थान येथील रहिवासी आहे. तिचे कुटुंब रोजगाराच्या निमित्ताने वीटभट्टीवर मजुरीचे काम करते. २३ जुलै रोजी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. (हे हि वाचा – वनक्षेत्रात चोरी, वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
गुरुवारी, २३ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी ज्या कंपनीत तिचे आई-वडील मजुरीचे काम करतात, त्या कंपनीच्या कार्यालयात बसलेली होती. दरम्यान, मुलीचे वडील जवळच असलेल्या चहाच्या दुकानात गेले असता, मुलगीही त्यांच्यासोबत गेली असावी असा समज तिच्या आईचा झाला. मात्र, काही वेळाने वडील एकटेच परत आल्यानंतर मुलीबाबत चौकशी केली असता ती त्यांच्यासोबत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी घर, कंपनीचे कार्यालय तसेच लगतच्या परिसरात शोधाशोध केली, मात्र मुलगी कुठेही मिळून आली नाही.
अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेऊनही कोणतीही माहिती न मिळाल्याने, तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पडोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पडोली पोलिसांनी त्वरित दखल घेत भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






