सिंदेवाही : Sindewahi Cyber Fraud News च्या या घटनेत एका अज्ञात लिंकवर क्लिक करणे कंपनी मॅनेजरला भलतेच महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी मोबाईलचा ताबा मिळवून मॅनेजरच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख रुपये लांबविले. ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे घडली आहे. याप्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांचे धागेदारे थेट पश्चिम बंगालपर्यंत पोहोचले आहेत. (हे हि वाचा – चंद्रपूर बस स्थानकावर शेतकऱ्याला लुटले)
सिंदेवाहीतील लोनवाही येथील मॅनेजरसोबत घडला धक्कादायक प्रकार
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील सावरगाटा येथील रहिवासी अतुल बाबुराव लोनबले (वय ३०) हे लोनवाही येथील ‘मल्टि अर्बन निधी लिमिटेड’ या कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी कामावर असताना त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर एक अनोळखी लिंक प्राप्त झाली. सदर लिंकवर क्लिक करताच त्यांच्या मोबाईलचा ताबा अचानक त्यांच्या हातातून गेला व हॅक झाला. काही वेळातच दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या बँक ऑफ इंडिया, शाखा गुंजेवाही येथील खात्यातून अनुक्रमे २ लाख रुपये आणि १ लाख रुपये असे एकूण ३ लाख रुपये डेबीट झाल्याचे संदेश मोबाईलवर धडकले.
खात्यातून अचानक पैसे गेल्याचे समजताच लोनबले यांनी तात्काळ बँकेत धाव घेऊन आपले खाते होल्डवर ठेवण्यास सांगितले आणि तात्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलच्या (NCCRP) ‘१९३०’ या हेल्पलाईन क्रमांकावर ऑनलाईन तक्रार नोंदवली.
पोलीस तपासात व पोर्टलच्या अहवालावरून निष्पन्न झाले की, सायबर भामट्यांनी लोनबले यांच्या बँक खात्यातून ३ लाख रुपये पळवून ते पश्चिम बंगालमधील हावडा (कोलकाता) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका खात्यात वळते (ट्रान्सफर) केले होते. त्यानंतर त्यातील ९९,५०० रुपये हावडा येथीलच पंजाब नॅशनल बँकेच्या दुसऱ्या खात्यात पाठवण्यात आले आणि काही वेळातच ही संपूर्ण रक्कम एटीएमच्या माध्यमातून रोख स्वरूपात काढून घेण्यात आली.
आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अतुल लोनबले यांनी सिंदेवाही पोलीस ठाण्यात गाठून रीतसर तोंडी तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी हावडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब नॅशनल बँकेच्या संबंधित खातेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम २००० च्या कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस या आंतरराज्य सायबर फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






