चंद्रपूर – Chandrapur Kidnapping Case: चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मुलीला पळवून नेऊन स्वतःच्या राहत्या घरात डांबून ठेवले होते. संशय आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घराकडे धाव घेतली. तेथे मुलीचा आवाज ऐकून जाब विचारणाऱ्या कुटुंबीयांना आरोपीने बेदम मारहाण केली. चंद्रपूर शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. (हे हि वाचा – चंद्रपुरातील बस स्थानकावर शेतकऱ्याला लुटले)
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी नववीच्या वर्गात शिकते. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सायकलने ती शाळेत गेली होती, मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. मुलगी वेळेत घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिच्या शाळेत आणि मैत्रिणींकडे चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान तिच्या मैत्रिणीने सांगितले की, ती तिच्यासोबत आली होती आणि तेथून ती तिच्या ओळखीच्या लोकेश चव्हाण या तरुणासोबत निघून गेली.
कुलूपबंद घरातून आला अल्पवयीन मुलीचा आवाज
या माहितीच्या आधारे मुलीच्या आईसह तिच्या मोठ्या बहिणी आणि भावाने तात्काळ संशयित आरोपी लोकेश चव्हाण याच्या घराकडे धाव घेतली. तेथे पोहोचले असता त्यांना अंगणात मुलीची सायकल दिसून आली, परंतु घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. संशय आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला असता आतून अल्पवयीन मुलीचा आवाज आला.
त्याच वेळी आरोपी लोकेश चव्हाण त्या ठिकाणी आला. मुलीच्या आईने त्याला तात्काळ दरवाजा उघडून मुलीला बाहेर काढण्यास सांगितले. यावरून आरोपीने कुटुंबीयांशी बाचाबाची करत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा उघडला असता पीडित मुलगी आत बसलेली आढळली. मुलीकडे चौकशी केली असता, आरोपीने आपल्याला फुस लावून पळवून आणले व घरात डांबून ठेवल्याचे तिने सांगितले.
मुलीला डांबून ठेवल्याचा जाब विचारला असता आरोपी लोकेश चव्हाण याने आक्रमक होऊन मुलीच्या मोठ्या बहिणीला हाताने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन तो घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलीच्या आईने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी लोकेश चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११५(२) (मारहाण करणे), १२७(२) (बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे), १३७(२) (अपहरण), ३५१(३) (जिवे मारण्याची धमकी देणे) आणि ३५२ (अनादर करणे किंवा शांतता भंग करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे पोलीस निरीक्षक निशिकान्त रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृणाल रामटेके या प्रकरणाचा पुढील तपास करत असून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






