Brahmapuri Witchcraft Case Belgaon Jani Police

‘तू माझ्यावर जादूटोणा केलास!’ जादूटोण्याच्या संशयावरून थेट जिवे मारण्याची

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 26, 2026

ब्रम्हपुरी: Brahmapuri Witchcraft Case मधील ताज्या अपडेटनुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव जानी येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्यावर जादूटोणा केल्याचा आचरट संशय घेऊन एका व्यक्तीने आपल्या मेव्हण्याला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील ५ सराईत गुन्हेगार तडीपार)

‘मांत्रिकाकडे चला, दोषी आढळलो तर मारून टाका’

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बेलगाव जानी येथील रहिवासी आणि व्यवसाय सुतारकाम असलेले गजानन लहानुजी वांढरे (वय ४०) हे २२ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात उभे होते. यावेळी त्यांच्याच गावातील आणि नात्याने मेव्हणा लागणारा भोजराज अंतारामजी आंबोने (वय ५५) हा त्यांच्याजवळ आला. त्याने गजानन वांढरे यांच्यावर “तू माझ्यावर जादूटोणा केला आहेस” असा गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. त्यावर वांढरे यांनी संयम दाखवत, “मी कोणत्याही मांत्रिकाकडे येण्यास तयार आहे, तेथे मी दोषी सिद्ध झालो तर मला तिथेच मारून टाका,” असे स्पष्ट उत्तर दिले.

मात्र, संशयग्रस्त असलेल्या भोजराज आंबोने याने काहीही न ऐकता वांढरे यांच्या आई-बहीण आणि कुटुंबाबाबत अत्यंत घाणेरड्या व अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एका मांत्रिकानेच मला तू जादूटोणा केल्याचे सांगितले आहे, असा दावा करत त्याने वांढरे यांच्या मनाला लज्जा वाटेल अशा शब्दांत अपमान केला व त्यांना जिवे मारण्याची थेट धमकी दिली.

विशेष म्हणजे आरोपी भोजराज आंबोने हा यापूर्वीही गावातील अनेक नागरिकांवर जादूटोणा केल्याचा संशय घेऊन त्यांना मारहाण आणि त्रास देत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीदेखील त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सततच्या या त्रासामुळे आणि झालेल्या प्रकारामुळे आपल्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच गजानन वांढरे यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली व रीतसर तक्रार नोंदवली.

तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी भोजराज अंतारामजी आंबोने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २९६ (अश्लील कृत्य व शिवीगाळ) आणि ३५१(३) (जिवे मारण्याची धमकी देणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद बानबाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्रनाथ मंडळ हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment