Ballarpur Guptadhan Crime Case बल्लारपूर पोलिसांकडून विसापूर शिवारातील आरोपींना अटक

बल्लारपूर विसापूर शिवारात मध्यरात्री गुप्तधनासाठी अघोरी पूजेचा डाव; महिलेसह ९ जणांना अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 11, 2026

चंद्रपूर / बल्लारशाह: Ballarpur Guptadhan Crime Case मध्ये पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीचा डाव उधळून लावला आहे. विसापूर शिवारात नदीकाठी गुप्तधनासाठी अघोरी पूजा करणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मध्यरात्री ही कारवाई यशस्वी ठरली. बल्लारपूर पोलिसांनी संशयित चारचाकी वाहन अडवून आरोपींना पकडले. (हे हि वाचा – जिल्ह्यातील ५२८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई)

आरोपींमध्ये नागपूर, यवतमाळ आणि वर्धा येथील व्यक्तींचा समावेश आहे. सर्वांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Ballarpur Guptadhan Crime Case मध्ये आंतरजिल्हा टोळी जेरबंद

गुप्तधनाचा शोध घेऊन एका रात्रीत श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी विसापूर शिवारात अघोरी विधी व जादूटोणा करण्याची जय्यत तयारी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बल्लारशाह पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक सतर्क नागरिकांच्या दक्षतेमुळे आणि पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या जाळ्यामुळे नदीकाठच्या निर्जन शिवारातून एका महिलेसह तब्बल नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून गुप्तधन शोधण्याच्या नावाखाली जादूटोणा व अघोरी विधी करण्याचे कारस्थान रचले गेले होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली असून सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विसापूर शिवारात मध्यरात्री गुप्तधनाचा शोध घेण्याचा अघोरी प्रयत्न

घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती अशी की, ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास MH-40-CX-4616 क्रमांकाची एक संशयास्पद चारचाकी गाडी विसापूर गावाजवळील नदीच्या दिशेने जाताना स्थानिक नागरिकांना दिसली. या वाहनात काही पुरुष आणि एक महिला संशयास्पदरीत्या बसलेले होते. ही मंडळी नदीकाठच्या शेतशिवारात गुप्तधन शोधण्यासाठी किंवा अघोरी जादूटोणा करण्याच्या उद्देशाने गेल्याचा संशय आल्याने विसापूरच्या काही सतर्क नागरिकांनी त्या गाडीवर पाळत ठेवली आणि तातडीने विसापूर पोलीस चौकीतील हवालदार माहूरकर यांना माहिती दिली.

संशयित चारचाकी वाहन आणि आरोपींची मध्यरात्री धरपकड

रात्रपाळीच्या पोलीस उपनिरीक्षक करिश्मा मोरे यांनी ही माहिती लगेच बल्लारशाहचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांना कळवली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक इंगळे हे पोलीस पथकासह शासकीय वाहनाने तातडीने विसापूर-कोलगाव फाट्यावर पोहोचले. तेथे स्थानिक नागरिक आधीच त्या संशयास्पद वाहनाची वाट पाहत उभे होते. काही वेळातच कोलगाव-विसापूर मार्गावरून संबंधित चारचाकी वाहन गावाच्या दिशेने परत येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी तत्परतेने ते वाहन अडवून त्यातील प्रवाशांची चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वाहनातील सात पुरुष व एका महिलेसह सर्वांना पुढील चौकशीसाठी बल्लारशाह पोलीस ठाण्यात आणले.

यवतमाळच्या मांत्रिकासह महिलेची विधीसाठी उपस्थिती

यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, निर्जन नदीकाठच्या शिवारात गुप्तधनासाठी अघोरी पूजा आणि खड्डा खोदण्याची पूर्वतयारी करण्यात आल्याचा उलगडा झाला. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांचे संपूर्ण नेटवर्क आणि प्रत्येकाची कामाची विभागणी पाहून पोलीसही चक्रावून गेले. तपासात समोर आले की, देवागन विक्रम सहारे (वय ४२, रा. हिंगणा, नागपूर) हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून त्यानेच सर्वांना गोळा केले होते. राजुरा तालुक्यातील रामपूर येथील शांताराम हिंगणे या फरार इसमाने आपल्या शेतात गुप्तधन असल्याचे सांगून देवागन याला जागा दाखवण्याचे आमिष दाखवले होते. या कामासाठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील श्यामराव नत्थु आत्राम (वय ५९) या मांत्रिकाला पाचारण करण्यात आले होते. गुप्तधनाच्या विधीच्या वेळी एका महिलेची उपस्थिती अनिवार्य असल्याने नागपूरच्या दिपाली दुर्गेश ढवराळ (वय ४०) हिला सोबत आणण्यात आले होते; सदर महिलेला गुप्तधनाच्या विधींची पूर्ण माहिती असल्याचे तिने स्वतः कबूल केले आहे.

महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दहा जणांवर गुन्हे दाखल

याशिवाय विधीच्या ठिकाणी खड्डा खोदण्यासाठी नरेंद्र बाबुराव राऊत (वय ५०, रा. नागपूर) व किशोर नानाजी नैताम (वय ५१, रा. यवतमाळ), खड्ड्यातील माती टोपलीने उपसण्यासाठी अमोल रामदास राऊत (वय ३२, रा. हिंगणघाट, वर्धा), गुप्तधनाच्या अपेक्षेने आलेला गणेश भदू झाडे (वय ३३, रा. कुही, नागपूर), पूजा साहित्य पुरवणारा राहुल सदाशिव खेडेकर (वय ३३, रा. आर्वी, ता. राजुरा) आणि नागपूरहून या सर्वांना गाडीने घेऊन येणारा चालक राम बाबाराव काळे (वय ४२, रा. नागपूर) अशा सर्वांची कामाची विभागणी ठरलेली होती. सर्व आरोपी परस्पर समन्वयाने मध्यरात्री अघोरी कृत्य करण्यासाठी एकत्र जमल्याचे सिद्ध झाले आहे.

या प्रकरणी बल्लारशाह पोलीस ठाण्याचे ठाणेदार बिपीन सुभाष इंगळे यांच्या तक्रारीवरून मुख्य सूत्रधार देवागन सहारे, मांत्रिक श्यामराव आत्राम, दिपाली ढवराळ यांच्यासह नऊ आरोपी आणि फरार शांताराम हिंगणे अशा एकूण १० जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३(२) व ३(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल राऊत करत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही अंधश्रद्धा, अघोरी प्रथा किंवा भोंदूगिरीला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment