चंद्रपूर: Chandrapur National Lok Adalat चे आयोजन चंद्रपूर शहर आणि जिल्हाभरात शनिवार, १२ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित या लोकअदालतीत प्रलंबित तंटे समोपचाराने मिटवले जातील. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय क. लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडणार आहे. यामध्ये विधीज्ञ आणि पक्षकारांना सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार परिषदेद्वारे ११ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. (हे हि वाचा – प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदवा – विभागीय आयुक्त यांचे आवाहन)
नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले दिवाणी व फौजदारी वाद सामंजस्याने सोडवावेत. लोकअदालतीमुळे वेळ आणि पैशांची मोठी बचत होते.
Chandrapur National Lok Adalat मध्ये प्रकरणांचा झटपट निकाल
दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन खटल्यांच्या फेऱ्यातून पक्षकारांची मुक्तता व्हावी आणि आपापसातील तंटे समोपचाराने निकालात निघावेत यासाठी चंद्रपूर शहर व जिल्हाभरात शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ‘राष्ट्रीय लोक अदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली) तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (उच्च न्यायालय, मुंबई) यांच्या निर्देशांनुसार ही देशव्यापी मोहीम स्थानिक पातळीवर राबवली जात आहे. या लोकअदालतीचे आयोजन चंद्रपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय क. लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, जिल्ह्यातील सर्व विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोक अदालतीचे निकाल थेट दिवाणी हुकूमनाम्याप्रमाणे कायदेशीर वैध
वेळ, पैसा आणि श्रमांची बचत करून वादांचा कायमस्वरूपी निपटारा करणे हे लोक अदालतीचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. या मंचावर प्रलंबित प्रकरणांचा आपसी समझोता आणि सर्वसंमतीने झटपट निकाल लावला जातो. विशेष म्हणजे, लोक अदालतीत पारित झालेल्या आदेशास थेट दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याएवढेच कायदेशीर महत्त्व प्राप्त असते आणि त्याची तशीच कायदेशीर अंमलबजावणीही करता येते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी पक्षकारांना कोणताही अतिरिक्त न्यायालयीन खर्च किंवा शुल्क द्यावे लागत नाही. दोन्ही पक्षांच्या संमतीने वाद मिटत असल्याने कोणाचाही पराभव न होता सर्वांना जिंकल्याचे समाधान मिळते, ज्यामुळे भविष्यातील परस्पर वैमनस्य आणि नवीन वाद टाळण्यास मोठी मदत होते.
जिल्हा मुख्यालयातील न्यायालयांसह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी ही लोकअदालत पार पडणार आहे. या मोहिमेत प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, कलम १३८ एन.आय. ॲक्टनुसार धनादेश न वटल्याची प्रकरणे, बँकांची कर्जवसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाईचे दावे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक व भाडेकरू वाद, घटस्फोट वगळता इतर सर्व कौटुंबिक तंटे तसेच वीज कायद्यांतर्गत समझोतायोग्य खटले तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय न्यायालयात प्रकरण दाखल होण्यापूर्वीची दाखलपूर्व (प्रि-लिटीगेशन) प्रकरणे, महसूल दावे, थकीत पाणीपट्टी आणि वीजबिलांसंबंधीचे वादही सामंजस्याने मिटवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर शि. इंगळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या पक्षकारांना आपली वादग्रस्त प्रकरणे या लोकअदालतीमध्ये सामंजस्याने सोडवायची असतील, त्यांनी तात्काळ संबंधित न्यायालयात अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. नागरिकांच्या मदतीसाठी आणि अधिक माहितीसाठी प्रशासनाने दूरध्वनी क्र. ०७१७२-२७१६७९ तसेच कार्यालयीन मोबाईल क्र. ८५९१९०३९३४ ही हेल्पलाइन उपलब्ध करून दिली आहे. पक्षकारांनी न्यायालयीन वादांवर कायमचा पडदा टाकण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






