Chandrapur Hotel Gambling Raid police action at Tukum Seva G Hotel

चंद्रपुरात जुगाराची “सेवा-जी’, एलसीबी पोहोचताच उडाली खळबळ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 26, 2026

चंद्रपूर: Chandrapur Hotel Gambling Raid: चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील एका हॉटेलच्या रूममध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ६ आरोपींसह त्यांना रूम उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून रोकड, डीव्हीआर आणि इतर साहित्यासह एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई २५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. (चंद्रपूर बस स्थानकावर शेतकऱ्याला लुटले, पोलिसांनी २ तासात आरोपीना शोधले)

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कामगिरी

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तुकुम येथील ‘सेवा-जी’ हॉटेलमधील रूम नंबर सी-०२ मध्ये काही इसम पैशांवर ताशच्या पत्त्यांचा कट-पत्ता नावाचा जुगार खेळत आहेत. बातमीची खात्री पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अधीक्षकांच्या रीतसर परवानगीने रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकाद्वारे छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. स्वतंत्र पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी ‘सेवा-जी’ हॉटेल गाठले.

हॉटेलच्या स्वागत कक्षात उपस्थित असलेला मॅनेजर प्रणय सत्यदेव मडपल्लीवार (वय १९, रा. विसापूर) याला पोलिसांच्या पथकाने आपली ओळख पटवून दिली आणि थेट रूम नंबर सी-०२ मध्ये प्रवेश केला. त्यावेळी रूममधील बेडवर आणि शेजारील खुर्च्यांवर ६ इसम पैशांची हारजीत लावून ताशच्या पत्त्यांवर जुगार खेळताना रंगेहात आढळले. पोलिसांनी पंचांसमक्ष तात्काळ सर्वांची झडती घेतली असता, आरोपींच्या अंगझडतीतून आणि डावावर लावलेली मिळून एकूण ३६ हजार ९०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. याव्यतिरिक्त ५२ ताशच्या पत्त्यांचा कॅट, एक लाल रंगाचे ग्राहक नोंदणी रजिस्टर आणि १० हजार रुपये किमतीचा सीपी प्लस कंपनीचा डीव्हीआर असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुगार खेळताना आढळले चंद्रपुरातील ६ आरोपी

पोलीस कारवाईत जुगार खेळताना आढळलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद सरफराजुल हक मोहम्मद नियजुल हक (वय ४३, रा. सरकार नगर), आमीन गफार बेग (वय ३४, रा. जटपुरा गेट वॉर्ड), इरफान खान लियाफत खान (वय ४४, रा. तुकुम), राजीक शहा आबीद शहा (वय ४०, रा. तुकुम), आयुष अनिल तुराणकर (वय २०, रा. तुकुम) आणि जावेद करीम शहा (वय ४०, रा. तुकुम) या सर्व राहणार चंद्रपूर येथील ६ जणांचा समावेश आहे. जुगार खेळणाऱ्या या ६ जणांसह, स्वतःच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर जुगारासाठी रूम उपलब्ध करून देऊन अपप्रेरणा देणारा हॉटेल मॅनेजर प्रणय मडपल्लीवार याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात सर्व ७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम ४ व ५ सह भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे अमलबजावणी अधिकारी करत आहेत. हॉटेलसारख्या सार्वजनिक ठिकाणी जुगार अड्डा चालवणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या या कडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment