भद्रावती पोलीस जुगार कारवाईनंतर बेलवरा शिवारात तैनात पोलीस पथक

भद्रावती पोलिसांची जुगार कारवाई: बेलवरा शेतशिवारात ५ आरोपी रंगेहात अटक, २ फरार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 5, 2026

भद्रावती: भद्रावती पोलीस जुगार कारवाई अंतर्गत बेलवरा शेतशिवारात ५ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. बाभळीच्या झाडाखाली मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पत्त्यांचा जुगार सुरू होता. दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबरच्या रात्री ही धाड पडली. पोलिसांनी रोकड, पत्ते आणि चार दुचाकी असा एकूण २ लाख ६५ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे सांगितले आहे. (वरोऱ्यात एकाला सळाखीने मारहाण, तिघांवर गुन्हे दाखल)

भद्रावती पोलीस जुगार कारवाई: गोपनीय माहितीवरून बेलवरा शिवारात धाड

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भद्रावती पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत असताना बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, बेलवरा गावातील शेतशिवारात एका बाभळीच्या झाडाखाली काही इसम मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात पैशांची बाजी लावून ५२ पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. बातमीची खात्री पटताच पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन बेलवरा शिवारात छापा टाकला. पोलिसांनी बाभळीच्या झाडाभोवती घेराव घालून धाड मारली असता त्या ठिकाणी जुगार खेळणारे ५ जण रंगेहात मिळून आले. तर इतर दोन जुगारी पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये गणेश दिनेश भोयर (वय ३१, रा. माजरी), निखिल चंद्रकांत बोंडे (वय ३५, रा. कुचना कॉलनी), उदय राजेंद्र वैद्य (वय २१, रा. बेलवरा), प्रणीत यशवंत मत्ते (वय ३१, रा. बेलवरा) आणि अतुल गजानन कुळमेथे (वय ३८, रा. माजरी) यांचा समावेश आहे. पळून गेलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांची नावे मनीष साळपुते (रा. कुचना) आणि स्वप्निल पिंपळकर (रा. किलोनी) अशी असल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून व आरोपींच्या अंगझडतीतून जुगाराच्या डावावरील आणि रोख रकमेसह एकूण ४ हजार ६५० रुपये, ५२ पत्ते तसेच जुगाऱ्यांच्या ताब्यातील चार दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये ज्युपिटर, पल्सर आणि दोन शाईन मोटारसायकलचा समावेश असून वाहनांची एकूण किंमत २ लाख ६० हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत पुंडलिक शेंडारे यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पी. एस. सिडाम करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment