चंद्रपूर गॅस सिलेंडर आग घटनेनंतर अग्निशमन दलाची कारवाई

चंद्रपुरात गॅस रिफिलिंगचा काळाबाजार, निवासी परिसरात भीषण आग, दोघे होरपळले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 20, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर गॅस सिलेंडर आग प्रकरण – चंद्रपुरातील मसीहा लॉन्स परिसरात गॅस सिलेंडरच्या आगीत दोन तरुण गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंटू बिश्नुई आणि रामविलास बिश्नुई अशी जखमींची नावे आहेत. दोघांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित घरात २९ गॅस सिलेंडर असल्याचे समोर आले आहे. चंद्रपुरात अनेक ठिकाणी लपून गॅस रिफलिंगचा काळाबाजार सुरु आहे, मात्र पुरवठा विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

चंद्रपूर गॅस सिलेंडर आग, मसीहा लॉन्स परिसरातील घटना

शहरातील विठ्ठल मंदिर प्रभाग अंतर्गत येणाऱ्या मसीहा लॉन्स परिसरातील एका घरात गॅस सिलेंडरला अचानक लागलेल्या भीषण आगीत दोघेजण गंभीररीत्या होरपळल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पिंटू बिश्नुई आणि रामविलास बिश्नुई अशी जखमींची नावे असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते. (चंद्रपूर रामनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, वाचा बातमी)

मिळालेल्या माहितीनुसार, मसीहा लॉन्स परिसरातील रहिवासी वारिस अली यांच्या घरात चेतक गॅस एजन्सीचे कर्मचारी असलेले पिंटू आणि रामविलास बिश्नुई हे भाड्याने राहत होते. गुरुवारी रात्री अचानक घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरने पेट घेतला. आगीचा भडका इतका भीषण होता की, यात दोन्ही तरुण गंभीररीत्या भाजले गेले. आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला याबाबत पाचारण केले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल होत अथक प्रयत्नांनंतर आगीवर काबू मिळवला. (चंद्रपूर गॅस सिलेंडर आग)

गॅस रिफिलिंग करताना घटना, चंद्रपूर गॅस सिलेंडर आग

सदर घरात एकूण २९ गॅस सिलेंडर साठवून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १३ घरगुती (रिकामे) आणि १६ मोठ्या व्यावसायिक सिलेंडरचा समावेश होता, त्यापैकी ६ व्यावसायिक सिलेंडर पूर्णपणे भरलेले होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरात घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधपणे गॅस भरण्याचा (रिफिलिंग) गोरखधंदा सुरू होता आणि याच प्रक्रियेदरम्यान गॅस गळती होऊन आग लागल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

दुसरीकडे, पोलिसांनी या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाला नसून स्वयंपाक करताना गॅस गळती झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. मात्र, निवासी भागातील एका घरात इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर का साठवून ठेवले होते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असून शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही.

चंद्रपूर गॅस सिलेंडर आग, स्वयंपाक करताना गॅस गळती

दरम्यान, आग लागल्यानंतर ती विझविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काही अज्ञात व्यक्तींनी घटनास्थळी वाहन आणून घरातील सर्व सिलेंडर घाईघाईत वाहनात भरून लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. इतक्या तत्परतेने हे सिलेंडर नेमके कुठे गायब करण्यात आले, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी सांगितले की, घरात स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे अचानक आग लागून दोघेजण होरपळले आहेत. जर सिलेंडरचा स्फोट झाला असता तर घटनास्थळी त्याचे अवशेष आढळून आले असते, परंतु तपासादरम्यान अशी कोणतीही वस्तू मिळून आलेली नाही. त्यामुळे हा स्फोट नसून आगीची घटना आहे. याप्रकरणी दोन्ही जखमींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment