चिमूर: चिमूर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. पूर्वी दिलेली पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी एका व्यक्तीला रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चिमूर पोलिसांनी सिंदेवाही येथील एका दांपत्याविरुद्ध कारवाई केली आहे. ही घटना ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी मौजा सातनाला परिसरात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदार चिमूर येथील एसटी आगारात कार्यरत आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. (सावधान, राजुऱ्यात एटीएम कार्ड बदलवून वृद्धाची फसवणूक, वाचा आणि सावध रहा)
चिमूर अॅट्रॉसिटी गुन्हा: नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर येथील रा.प.म. (एसटी) आगारात कार्यरत असलेले तक्रारदार राकेश मधुकर अलोने (वय ३६, रा. वडाळा पैकू, चिमूर) यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी आरोपींविरुद्ध चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी प्रोपेश्वर ग. दिघोरे आणि वैशाली प्रोपेश्वर दिघोरे (दोघे रा. सिंदेवाही) यांच्याविरुद्ध एनसीआर नोंदवला होता.
याच एनसी तक्रारीचा राग मनात धरून ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास मौजा सातनाला परिसरात आरोपी दांपत्याने राकेश अलोने यांना रस्त्यात अडवले. पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आरोपींनी त्यांना अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली आणि अपमानित केले. तसेच “तक्रार मागे घे, अन्यथा खल्लास करून टाकीन” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. नोकरीवर गदा आणण्याची आणि खोट्या आरोपात अडकवण्याची धमकीही यावेळी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेदरम्यान तेथून जात असलेले श्रीकांत गिरडकर आणि प्रशांत कानिंदे यांनी मध्यस्थी केली. याप्रकरणी राकेश अलोने यांनी ५ ऑक्टोबर रोजी चिमूर पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी प्रोपेश्वर दिघोरे व वैशाली दिघोरे या दांपत्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), ३५१(२), ३५१(३) सह अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कलम ३(१)(r) आणि ३(१)(s) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) दिनकर ठोसरे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






