चंद्रपूर:- चंद्रपूर विजेचा शॉक मृत्यू प्रकरणात ताडाळी येथील केतन हुंडाई वर्कशॉपमध्ये २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. काम करत असताना त्याला विजेचा तीव्र शॉक लागला. या दुर्घटनेत त्याचा सहकारी जखमी झाला आहे.मृत तरुणाचे नाव सारंग उर्फ मोहन कोयचाडे (रा. मोरवा) आहे. जखमी शुभम उमाटे (वय २९) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (एटीएम मध्ये वृद्धाची फसवणूक, वाचा सावधतेची बातमी)
चंद्रपूर विजेचा शॉक मृत्यू: ताडाळीत नेमके काय घडले?
ताडाळी येथील ‘केतन हुंडाई वर्कशॉप’मध्ये काम करत असताना विजेचा तीव्र झटका लागल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाचे नाव सारंग उर्फ मोहन कोयचाडे (वय २१ वर्षे, रा. मोरवा) तर जखमीचे नाव शुभम उमाटे (वय २९ वर्षे) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन कोयचाडे आणि शुभम उमाटे हे दोघे तरुण या वर्कशॉपमध्ये डेंटिंग आणि पेंटिंगचे काम करतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे दोघे कामावर पोहोचले. काहीतरी जळाल्याचा किंवा वेगळा वास येत असल्यामुळे त्यांनी टिनाच्या शेडवर चढून पाहणी केली. दरम्यान, वर्कशॉपच्या जवळ असलेल्या एका झाडाला जिवंत विद्युत तारेतून झाडामध्ये विजेचा प्रवाह पसरला होता. मोहन कोयचाडे यांचा चुकून या झाडाला स्पर्श झाला आणि त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला.
सोबत असलेला सहकारी शुभम उमाटे यांनी मोहनला विजेच्या झटक्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात शुभम यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. कसेतरी त्यांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच मोहन कोयचाडे यांचा मृत्यू झाला. तर जखमी शुभम उमाटे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, कुटुंबाचा आधार हिरावल्याने कोयचाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मोहन च्या मृत्यूनंतर नागरिकांनी केतन ह्युंडाई कंपनीकडे आर्थिक मदतीची मागणी केली, गावातील नागरिक, नातेवाईक व कामगारांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली, तणाव वाढत असल्याचे पाहून रामनगर पोलीस व दंगा नियंत्रण पथक दाखल झाले. तणावाच्या स्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत व पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी स्थितीवर नियंत्रण मिळवले.
जर आथिर्क मदत मिळाली नाही तर मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवणार असा इशारा गावकर्यांनी दिला, तब्बल अडीच तासानंतर मृतक मोहन च्या कुटुंबाला १४ लाखांची आर्थिक मदत व वडिलांना नोकरी देण्याचे ठरल्याने नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






