चंद्रपूर – Durgapur Police Weapon Arrest अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला बेकायदेशीरपणे घातक शस्त्र बाळगून फिरताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक २ मधील ओपन जिमच्या समोरील झुडपी जंगलात सोमवारी ही धडक कारवाई करण्यात आली. स्मित विनोद भांडेकर (वय १८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३० सें.मी. लांबीचा धारदार स्टीलचा चाकू जप्त करण्यात आला आहे. शहरात गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी आता कारवाई तीव्र केली आहे. (हे हि वाचा – बाबुपेठमध्ये दोघांवर चाकू हल्ला)
Durgapur Police Weapon Arrest: पोलिसांनी कशी केली कारवाई?
दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत असताना, एक इसम आपल्या कमरेला चाकूसारखे धारदार हत्यार खोचून झुडपी जंगलात संशयास्पदरित्या वावरत असल्याची अन् कुठलातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली. बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने दोन निष्पक्ष पंचांना पाचारण केले आणि पंचांसह घटनास्थळी धाव घेतली.
ओपन जिम समोरील परिसरात पाहणी केली असता, गुप्त बातमीदाराने वर्णन केलेला तरुण तिथे पोलिसांना संशयास्पद स्थितीत मिळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला काळ्या रंगाची प्लास्टिक मुठ असलेला स्टीलचा धारदार चाकू आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या चाकूची एकूण लांबी ३० सेंटीमीटर, पात्याची लांबी १८ सेंटीमीटर आणि मुठीची लांबी १२ सेंटीमीटर असून त्याचे बाजारमूल्य सुमारे ३०० रुपये असल्याची नोंद एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार भरत निलकंठ चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी स्मित भांडेकर याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाणे प्रभारी निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार स्वप्निल बुटिले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शहरात गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






