चंद्रपूर: Chandrapur Crime Report अंतर्गत्त एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील समता चौकात जुन्या वादातून दोन भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुपारी झालेल्या किरकोळ तोंडी वादानंतर रात्रीच्या वेळी गाठून चाकूने वार करण्यात आले, ज्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा मोठा भाऊदेखील जखमी झाला आहे. (वरोऱ्यात ATM फोडण्याचा प्रयत्न, सीसीटीव्ही मध्ये सगळं समोर)
Chandrapur Crime Report : बाबूपेठ समता चौक परिसरातील धक्कादायक घटना
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बाबूपेठ येथील समता चौक परिसरात राहणारा यश मरिबा मगरे (वय १९, शिक्षण बी.कॉम प्रथम वर्ष) याने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी, १९ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घराजवळ राहणाऱ्या लक्की वासनिक याने यशला फोन करून, त्याच्या १६ वर्षीय लहान भाऊ आदित्य याने शिवीगाळ केल्याचा आरोप केला. भाऊ लहान असून त्याने शिवीगाळ केली असल्यास मी माफी मागतो, त्याला मारहाण करू नको, अशी विनंती यशने केली. मात्र, लक्कीने फोन कट केला. त्यानंतर यशने घराबाहेरून आलेल्या लहान भाऊ आदित्यला कोणालाही शिवीगाळ करू नको असे समजावून सांगितले.
दरम्यान, रात्री ९ वाजताच्या सुमारास यश आणि त्याचा भाऊ आदित्य हे जेवण करून घराजवळील विशाल यांच्या पान ठेल्यासमोर बोलत उभे होते. त्यावेळी लक्की वासनिक आणि त्याचा मित्र वैभव हे दोघे दुचाकीने तेथे आले. दुपारी झालेल्या वादाचा राग मनात धरून लक्कीने हातात घेतलेल्या चाकूने आदित्यच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या यशवरही लक्कीने चाकूने हल्ला केल्याने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला व मनगटाला दुखापत झाली, तर वैभवने दोघा भावांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी आदित्यला त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी लक्की वासनिक आणि त्याचा मित्र वैभव या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१), ३(५) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपती तुकाराम वढई करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






