गोंडपिपरी येथील जळालेले किराणा दुकान (Gondpipri Shop Fire)

गोंडपिपरी येथील किराणा दुकानाला आग, ९ ते १० लाखांचे नुकसान

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 22, 2026

चंद्रपूर: Gondpipri Shop Fire प्रकरणात फुर्डीहेटी येथील एका किराणा दुकानात अज्ञात इसमाने कुलूप तोडून आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत किराणा सामान, फर्निचर, टीव्ही, कुलर यांसह रोकड व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. दुकानमालक संघराज तेलसे कुटुंबासह बाहेरगावी असताना घरी असलेल्या त्यांच्या आईला धूर दिसल्याने ही घटना उघडकीस आली. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली, मात्र सुमारे ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाले. गोंडपिपरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (हातात तलवार घेऊन दहशत, वाचा पोलिसांची कारवाई)

मिळालेल्या माहितीनुसार, फुर्डीहेटी (ता. गोंडपिपरी) येथील रहिवासी संघराज केशव तेलसे (वय ५०) हे आपल्या कुटुंबासह राहून शेती आणि जोडधंदा म्हणून किराणा दुकान चालवतात. भाच्याच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी ते १८ सप्टेंबर २०२६ रोजी कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. घरी त्यांची ५० वर्षीय आई जिजाबाई केशव तेलसे हजर असून त्या दुकान सांभाळत होत्या.

Gondpipri Shop Fire फुर्डीहेटीतील किराणा दुकानाला भीषण आग

दरम्यान, २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:३० ते ११:०० वाजेच्या सुमारास जिजाबाई घराबाहेर निघाल्या असता, त्यांना दुकानाच्या शटरमधून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ आरडाओरड केल्यावर शेजारी व नातेवाईक गोळा झाले. सर्वांनी दुकानाजवळ जाऊन पाहणी केली असता, उजव्या बाजूच्या शटरचे कुलूप तोडलेले आणि शटर अर्धवट उघडलेले दिसले. दुकानाच्या आत भीषण आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी तात्काळ गोंडपिपरी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

९ ते १० लाखांचे नुकसान — काय काय जळाले?

घटनेची माहिती मिळताच संघराज तेलसे यांनी २१ सप्टेंबर रोजी रात्री गावात पोहोचून दुकानाची पाहणी केली. या दुर्घटनेत दुकानातील सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे किराणा सामान, दीड ते दोन लाख रुपयांचे फर्निचर, टीव्ही व कुलर, तसेच ३० ते ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि दुकानाचे वहीखाते व परवाना जळून भस्मसात झाला.

अज्ञाताने चोरीच्या उद्देशाने किंवा वैमनस्यातून शटरचे कुलूप तोडून दुकानाला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेप्रकरणी संघराज तेलसे यांच्या तोंडी तक्रारीवरून गोंडपिपरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३२४(५), ३२६(f) आणि ३३२(c) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment