गोंडपिपरी पोलिसांनी तारसा येथे जप्त केलेली लोखंडी तलवार (Gondpipri Sword Arrest)

गोंडपिपरी तारसा येथे तलवार घेऊन दहशत माजवणारा चालक पोलिसांच्या ताब्यात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 22, 2026

गोंडपिपरी – Gondpipri Sword Arrest प्रकरणात तारसा येथील ट्रक पार्किंग परिसरात हातात उघडी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका चालकाला गोंडपिपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्रगस्त करत असताना पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीकडून ५४ सेमी पात्याची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून, त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना आढळला नाही. या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, वाचा हि बातमी)

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे सह. फौजदार राजिक शेख आणि पोलीस अंमलदार गितेश्वर बावणे हे रात्रगस्त आणि पेट्रोलिंग करत असताना, मौजा तारसा येथील ट्रक पार्किंग परिसरात एक इसम हातात उघडी तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ दोन पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

तारसा ट्रक पार्किंगमध्ये तलवारधारी चालकाची दहशत

ट्रक पार्किंग परिसरात जाऊन पाहणी केली असता, तेथे एक व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेऊन संशयास्पदरित्या वावरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन नाव विचारले असता, त्याने आपले नाव कमल प्रेमलाल नेताम (वय ३२, धंदा खाजगी चालक, रा. कोलारघाट, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) असे सांगितले.

संशयिताकडे असलेल्या शस्त्राबाबत आणि ते बाळगण्याच्या परवान्याबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता, त्याच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. तसेच हे शस्त्र कुठून व कशासाठी आणले, याबद्दल तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने तो ही धारदार तलवार घेऊन फिरत असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त तलवार आणि दाखल गुन्हा

त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत ५४ सेमी पात्याची आणि ६८ सेमी एकूण लांबी असलेली सुमारे ८०० रुपये मूल्याची लोखंडी तलवार जप्त केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी पोलीस अंमलदार राजिक शेख यांच्या तक्रारीवरून आरोपी कमल नेताम याच्याविरुद्ध कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मल्लय्या नार्गेवार करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment