गोंडपिपरी: गोंडपिपरी तालुक्यातील फुरडी हेटी येथे पोलिसांमार्फत (Gondpipri Tobacco Raid) कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या आरोपीच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी २५ हजार ३५० रुपये किमतीचा अवैध तंबाखू साठा जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (शासकीय अभियंत्याला मारहाण, बार चालकावर गुन्हा दाखल)
Gondpipri Tobacco Raid : फुरडी हेटी गावात पोलिसांची मोठी धाड
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी गोंडपिपरी पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. मौजा फुरडी हेटी येथील संघराज केशव तेलसे (वय ५० वर्ष) हा आपल्या राहत्या घरात शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा मोठा साठा करून ठेवत असून, तिथूनच तो त्याची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या खात्रीशीर माहितीच्या आधारे गोंडपिपरी पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन अचानक छापा टाकला. घराची कसून पाहणी केली असता, एका खोलीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी खोलीतून ‘होला हुक्का’ नावाचे एक किलो वजनाचे १४ सीलबंद पाकिटे जप्त केली, ज्याची प्रति पाकीट किंमत १३२५ रुपये प्रमाणे एकूण १८ हजार ५५० रुपये आहे. यासोबतच ‘इगल तंबाखू’चे ४०० ग्रॅम वजनाचे ०८ पाकिटे जप्त करण्यात आली, ज्याची प्रति पाकीट ८५० रुपये किंमत असून एकूण मूल्य ६ हजार ८०० रुपये भरते. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण २५ हजार ३५० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा घटनास्थळावरून हस्तगत केला.
या बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने आरोपी संघराज केशव तेलसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या सहकलम २६(१), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a), ५९ अन्वये गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि मूल विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस हवालदार अनुप कवठेकर, पोलीस अंमलदार सचिन झाडे, सुनील गव्हारे, आणि चालक सहाय्यक फौजदार पुनेश्वर कुळमेथे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






