नागभीड : (nagbhid engineer assault case) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक अभियंत्याला दारूच्या नशेत अडवून अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मौजा नवेगाव पांडव गावालगतच्या घोडाझरी शाखा कालवा परिसरात सुरू असलेल्या शासकीय बांधकामाच्या ठिकाणी ही हुल्लडबाजी करण्यात आली. आरोपी बार चालकाने शासकीय वाहनाची चावी जबरदस्तीने काढून घेत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अभियंत्याच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. (हे हि वाचा – बाल गुन्हेगारांची अट्टल टोळीला घेतले ताब्यात, ३ गुन्ह्यांची उकल)
nagbhid engineer assault case : घोडाझरी कालवा साईटवर मोठी हुल्लडबाजी
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विदर्भ पाटबंधारे विभाग अंतर्गत गोसेखुर्द उजवा कालवा विभाग सायगाटा कार्यालयाच्या वतीने मौजा नवेगाव पांडव गावालगत घोडाझरी शाखा कालवा साखळी क्रमांक १२०८० मीटर येथे सध्या एका पंपहाऊसचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट नागपूरच्या एका कंपनीला देण्यात आले असून, निविदा व अटीशर्तींनुसार कामाची गुणवत्ता आणि मोजमाप यावर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक अभियंता विजय गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बांधकामासाठी गिट्टी, रेती, सिमेंट आणि लोखंड यांसारखे साहित्य मोठ्या प्रमाणात लागत असल्याने, या परिसरात साहित्य वाहून नेणाऱ्या ट्रक व टिप्पर गाड्यांची मोठी वर्दळ असते. काल १७ जुलै २०२६ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास अभियंता विजय गिरासे हे त्यांचे सहकारी प्रफुल गांगुर्डे यांच्यासह शासकीय वाहनाने (क्र. MH 34 BB 1358) चालू असलेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी साईटवर गेले होते. ते साईटवर उभे असतानाच, कावेरी बारचा मालक सचिन मोहन करूडकर (रा. नवेगाव पांडव) हा दारूच्या नशेत मोटारसायकलने त्या ठिकाणी आला.
नशेत धुंद असलेल्या सचिन करूडकर याने ‘हे माझे गाव आहे, तुमच्या अवजड गाड्यांमुळे रस्ता खराब झाला आहे, मी इथून गाड्या जाऊ देणार नाही आणि तुम्ही काम कसे करता तेच बघतो’ अशी दमदाटी करत अभियंता गिरासे यांना अश्लील शिवीगाळ सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्याने गिरासे यांची कॉलर पकडून त्यांना हाताळण्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांचा शर्ट फाटला. या गोंधळानंतर जेव्हा अभियंता गिरासे आणि प्रफुल गांगुर्डे हे शासकीय वाहनाने गोसेखुर्द कॉलनीकडे जाण्यासाठी निघाले, तेव्हा नवेगाव पांडव टी-पॉईंटवरील कावेरी बारजवळ आरोपीने बांधकामाची खडी घेऊन येणारा एक टिप्पर अडवून धरला होता.
शासकीय वाहन समोर येताच आरोपीने गाडी अडवली आणि जाब विचारला असता पुन्हा अत्यंत घाणेरडी शिवीगाळ करत शासकीय वाहनाची चावी जबरदस्तीने ओढून घेतली व त्याच चावीने अभियंता गिरासे यांच्या छातीवर मारहाण केली. त्यानंतर गिरासे यांनी प्रसंगावधान राखून आरोपीकडून चावी हिसकावून घेतली आणि गाडी काढून तेथून पळ काढला. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी १८ जुलै रोजी पहाटे २:५२ वाजता आरोपी सचिन मोहन करूडकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १२Grid(२), १३२, २२१ आणि २९६ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक रमाकांत दत्तात्रय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप गोपीचंद पोटभारे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






