चंद्रपूर / राजुरा: Chandrapur Gambling Raid जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. मौजा सोनुर्ली येथील एका फार्महाऊसमध्ये चालणाऱ्या ‘विनर्स सोशल क्लब’वर पोलिसांनी रविवारी रात्री अचानक छापा टाकून व्यवस्थापकासह तब्बल ४० जणांना ताब्यात घेतले असून, लाखो रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे, पकडण्यात आलेले सर्व आरोपी हे शेजारील तेलंगणा राज्यातील विविध जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. (चिमुकलीसह २ ठार, वाचा अपघाताची बातमी)
फार्महाऊसवरील जुगार अड्ड्यावर Chandrapur Gambling Raid चे नियोजन
प्राप्त माहितीनुसार, मौजा सोनुर्ली शिवारातील एका फार्महाऊसमध्ये बेकायदेशीररीत्या ५२ पत्त्यांवर पैशांची मोठी बाजी लावून ‘तीन पत्ती’चा हारजितचा जुगार सुरू असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली विरुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, डीबी पथक आणि विरुर पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन पंचांसह २० सप्टेंबरच्या रात्री सुमारे पावणेआठच्या सुमारास सोनुर्ली येथील क्लबच्या बंदिस्त हॉलवर अचानक छापा टाकला.
१५ टेबलांवर सुरू होता ‘तीन पत्ती’ खेळ; ४० जुगारी पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांचे पथक हॉलमध्ये दाखल झाले असता तेथे तब्बल १५ टेबलांवर आणि खाली बसून मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याचे धक्कादायक दृश्य दिसून आले. पोलिसांना पाहताच काही जुगारांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत जागेवरच ४० जणांना घेराव घालून ताब्यात घेतले.
हे आहेत जुगार बहाद्दर
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये जुगार अड्ड्याचा व्यवस्थापक (मॅनेजर) अंजनेल्लु मलय्या पल्ले (रा. रामगुंडम, जि. आदिलाबाद) याच्यासह किशन केसन गोट (रा. गुल्लेटी), रविंदर प्रवताल देवसानी (रा. जुलापल्ली), मल्लेश लच्चया थुम्मा (रा. टेकमाटला), सत्यनारायण लचय्या गुरम (रा. रामनगर), संजिवा रेड्डी मधुगुल्ला (रा. नरसमपेठ), क्रीष्णय्या नारायणा वेनुला (रा. समागुडम), थट्टी वेंकागम जेपाल (रा. बेजला), नविनकुमार सत्यनारायणा पेदापल्ली (रा. रामनगर), पिटला लक्ष्मण (रा. बजरपल्ली), संपत दावा रेड्डी (रा. नुसतुलापुर), मल्ला रेड्डी मुदगुल्ला (रा. नरसमपेठ), सुधागोणे भास्कर (रा. मलकापुर), मस्के तेजाराव (रा. बेल्ला), गुड्डम प्रसाद गौड (रा. ईंदरम), बेत्तु तिरुपती रेड्डी (रा. येलगाती), गड्डा संतोष कुमार (रा. सुलतानाबाद), बट्टु संबय्या गिरी कुमार (रा. हरमगुडा), कोलीपक्का श्रिनिवास (रा. पेचकपेठ), बिंगी गुणेश कुमार (रा. हसनपरती), दामोदर महेंधर अनुमुल्ला (रा. वेमुलापल्ले), कन्ने बोइना महेश (रा. देशापेठ),
टेकरला विजय (रा. मंचेरियाल), अक्कुला नरेश (रा. मंचेरियाल), कामपेल्ली बलराजु (रा. वरंगल), कुप्पाला मलय्या रवी (रा. कोटापल्ली), आनंदबाबु शिवराजम टिप्पाणी (रा. वरंगल), राजु मलय्या कोंडीला (रा. वरंगल), महेश भिमला बानुत (रा. वरंगल), विरन्ना राम बोडा (रा. उपलपाड मंडल बयाराम), प्रभाकर भारत निम्मा (रा. महाबुभबाद मंडल), वासुदेव वदेलु सीरमला (रा. करीमाबाद), प्रविण चंद्रय्या मुडीपी (रा. पीरजादीगुडा मंडल उपल), महेश मलय्या कनेभोयीना (रा. देसाईपेठ), मोहम्मद समिरपाशा वली (रा. गुंडेळ), नरेश नरसिंगराव रेनकुंटला (रा. पुपातागुडा), मुरलीधर व्यंकट रेड्डी (रा. कोंडमोट मंडल कोडापल्ली), सत्यनारायण किष्टय्या अकलता (रा. गौतमनगर), रजन्ना अंकुल टोटा (रा. शिरपुर) आणि कन्नाप्रती नरसीम्मा छार्य (रा. रत्नापुर) यांचा समावेश आहे.
रोख रक्कम, नोटा मोजण्याचे मशीन आणि जुगाराचे साहित्य जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्याची आणि तेथील संशयितांची सखोल झडती घेतली. त्यामध्ये आरोपींच्या अंगझडतीतून ५६ हजार ७१० रुपये, टेबलच्या ड्रॉव्हरमधून ८४ हजार ४०० रुपये आणि मॅनेजरच्या केबिनमधील लोखंडी कपाटातून ५ लाख ८ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले. याशिवाय जुगारासाठी वापरले जाणारे विविध मूल्यांचे शेकडो प्लास्टिक कॉईन्स, ‘ड्रॉप २ कार्ट’ नोटा मोजण्याचे मशीन, ३ कॅल्क्युलेटर, पत्त्यांचे ५४० हून अधिक कॅट्स, जुगाराच्या हिशोबाचे दस्तऐवज आणि व्यवस्थापकाचा अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ७६ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी विरुर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जुगार अड्ड्याचा मॅनेजर अंजनेल्लु मलय्या पल्ले याच्यासह वरील सर्व ४० आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचे कलम ४ व ५ सह महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३३(x), १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विरुर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






