Rajura Gambling Club Raid दरम्यान पोलिसांनी जप्त केलेली रोकड व जुगाराचे साहित्य

राजुऱ्यात सीमावर्ती जुगार क्लबवर पोलिसांचा छापा; ५० लाखांची रोकड जप्त?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 20, 2026

चंद्रपूर / राजुरा: Rajura Gambling Club Raid महाराष्ट्र–तेलंगणा सीमेवर वसलेल्या राजुरा तालुक्यातील सोनुर्ली-लकडकोट परिसरात रविवारी पोलिसांनी एका वादग्रस्त क्लबवर अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. मनोरंजनाच्या नावाखाली या क्लबमध्ये हाय-प्रोफाइल जुगाराचा मोठा डाव मांडण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या छापेमारीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ५० लाख रुपयांची भलीमोठी रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, तब्बल 150 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने सीमावर्ती भागातील ‘क्लब सिंडिकेट’चे धाबे दणाणले आहेत. (राजुऱ्याचा API म्हणतो कोण भोंगळे, कोण धोटे? वाचा हि बातमी)

Rajura Gambling Club Raid तेलंगणातून आले होते बडे खेळाडू; धाडीनंतर उडाली एकच पळापळ

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर हा परिसर येत असल्याने, दोन्ही राज्यांतील बड्या जुगारींसाठी हा क्लब सुरक्षित अड्डा बनला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी या क्लबमध्ये तेलंगणातून मोठ्या संख्येने धनाढ्य खेळाडू आले होते. पोलिसांचे पथक अचानक क्लबमध्ये दाखल होताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच गोंधळ आणि धावपळ उडाली. बंद दारांआड टेबलवर लाखो रुपयांच्या नोटांचे बंडल आणि पत्ते पसरलेले असतानाच पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला.

साडेचारशे ते पाचशेच्या गर्दीतून 150 जण रडारवर

कारवाईच्या वेळी क्लबमध्ये प्रचंड गर्दी होती. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 150 संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्यांमध्ये नेमके खेळाडू किती आणि क्लबचे कर्मचारी किती, तसेच कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले, यावर सध्या पोलीस ठाण्यात पडताळणी सुरू आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्याचे काम आणि जप्ती पंचनाम्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती आहे.

आयपीएस कुमार सुशांत यांची धडक; सीमाभागात मकोकानंतर जुगार अड्ड्यांवर नजर

राजुरा उपविभागाची धुरा हाती घेतलेले धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी कुमार सुशांत (SDPO) यांच्या कार्यकाळात सीमावर्ती भागातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी फास आवळायला सुरुवात केली आहे. नुकतेच राजुऱ्यातील बहुचर्चित पापा जाधव हत्या प्रकरणात संघटित गुन्हेगारी मोडीत काढत मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट सीमाभागातील जुगार अड्ड्यावर झालेली ही मोठी कारवाई अवैध धंदे चालवणाऱ्यांसाठी थेट इशारा मानली जात आहे.

परवान्याच्या आडून जुगार? प्रशासनाचे कायदेशीर आव्हान

या कारवाईनंतर स्थानिक पातळीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा क्लब नेमका कोणत्या परवान्याच्या आधारे चालवला जात होता? मनोरंजनाच्या किंवा खेळांच्या नावाखाली मिळालेल्या परवान्याचा गैरवापर करून इथे कॅसिनोच्या धर्तीवर अवैध जुगार अड्डा कोण चालवत होते? या रॅकेटमागे सीमेपलीकडील कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत?

स्थानिक नागरिकांच्या मते, ही कारवाई केवळ एक दिवसाच्या छाप्यापुरती मर्यादित न राहता क्लबचे संचालक, फायनान्सर आणि स्थानिक पातळीवर त्यांना पाठबळ देणाऱ्यांचे नेटवर्क उघडकीस आणणे गरजेचे आहे.

दरम्यान, जप्त केलेली रोकड, जुगाराचे साहित्य आणि नोंदवलेल्या गुन्ह्यांबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी झाल्यानंतरच या कारवाईचे सर्व अधिकृत तपशील स्पष्ट होणार आहेत. मात्र, सोनुर्लीतील या छाप्यामुळे सीमावर्ती भागातील ‘क्लब संस्कृती’चा पर्दाफाश झाला असून खळबळ उडाली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment