नागभीड / तळोधी: Gondia Ballarshah Rail Wildlife मार्गावर पुन्हा एका वन्यजीवाचा बळी गेला आहे. ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीटमध्ये रेल्वेच्या धडकेत एका पूर्ण वाढ झालेल्या मादी अस्वलाचा मृत्यू झाला. रुळांलगत काम करणाऱ्या मजुरांना मृतावस्थेतील अस्वल आढळले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनात अंतर्गत गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाले. (वाघाने केली गुराख्याची शिकार, वाचा बातमी वाघाची)
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांच्या परिसरात काम करणाऱ्या मजुरांना रुळांलगत मादी अस्वल मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले. मजुरांनी तातडीने याची माहिती तळोधी वनविभागाला दिली. माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी, जीवशास्त्रज्ञ (बायोलॉजिस्ट) राकेश अहुजा यांच्या सूचनेनुसार क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक बांगर यांनी वन्यजीव अभ्यासक तथा स्वाब (SWAB) संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर व बचाव दलप्रमुख जीवेश सयाम यांच्या उपस्थितीत घटनास्थळी धाव घेतली. तिथे पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावरगाव येथील वन आगारात हलवण्यात आला.
Gondia Ballarshah Rail Wildlife अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्याने मृत्यू
पशुसंवर्धन नागभीडचे सहाय्यक आयुक्त डॉ. सतीश तांबे, तळोधीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा आकरे आणि चंद्रपूर टीटीसीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोचलवार यांनी शवविच्छेदन पूर्ण केले. रेल्वेच्या जोरदार धडकेमुळे अस्वलाच्या बरगड्या तुटल्या होत्या तसेच शरीराच्या अंतर्गत भागांना गंभीर इजा पोहोचली होती, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले. त्यानंतर सावरगाव वन आगारात उपस्थित वनाधिकारी, स्वाब संस्थेचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नियमानुसार अस्वलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; आंदोलनाचा इशारा
गोंदिया–बल्लारशाह हा रेल्वे मार्ग नवेगाव–नागझिरा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि ब्रह्मपुरी वनविभागाच्या सलग वनक्षेत्रातून जातो. त्यामुळे या मार्गावर दरवर्षी वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, नीलगाय, सांबर आणि चितळ यांसारख्या अनेक वन्यजीवांना भरधाव धावणाऱ्या गाड्यांमुळे जीव गमवावा लागतो.
रेल्वे विभागाकडून वारंवार आवश्यक त्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वन्यजीवांचे हे अपघात रोखण्यासाठी जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळांच्या दुतर्फा मजबूत जाळीचे कुंपण (Fencing) उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी स्वाब संस्थेने केली आहे. प्रशासनाने त्वरित योग्य पावले न उचलल्यास वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






