चंद्रपूर : चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्गावर (Chandrapur Sloth Bear Accident) एक अत्यंत दुर्दैवी आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आगडी गावाजवळील जंगल परिसरात एका दुर्मिळ नर चांदी अस्वलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी हा मृतदेह जानाळा बिट कक्ष क्रमांक ७१४ मध्ये आढळून आला. या महामार्गावर वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या चांदी अस्वलांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असून वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार)
Chandrapur Sloth Bear Accident : आगडी गावाजवळील जंगलात घडली दुर्दैवी घटना
चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग (NH-930) वरील आगडी गावाजवळील जंगल परिसरात दुर्मिळ नर चांदी अस्वलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. जानाळा बिट कक्ष क्रमांक ७१४ मध्ये हा मृत वन्यप्राणी आढळून आला. विशेष म्हणजे, या महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चांदी अस्वलांची संख्या आता चारवर पोहोचली असून, या मार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य शशांक मोहरकर हे सकाळी या मार्गाने प्रवास करत असताना त्यांना रस्त्यालगत चांदी अस्वल मृतावस्थेत दिसून आले. त्यांनी तातडीने संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे तसेच नाजिश अली यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली महेशकर यांना घटनेची माहिती कळविली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली.
चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग हा कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य यांना जोडणाऱ्या अतिसंवेदनशील वन्यजीव भ्रमणमार्गातून जात असल्याने या मार्गावर वन्यप्राण्यांची सतत वर्दळ असते. मात्र वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी आवश्यक असलेल्या उपशमन उपाययोजना अद्यापही पूर्णपणे राबविण्यात आलेल्या नसल्याने वारंवार अपघात घडत असून दुर्मिळ वन्यजीवांचा बळी जात आहे.
यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये केसलाघाट परिसरात ‘के-मार्क’ नावाच्या वाघिणीच्या पिल्लाचाही याच महामार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतरही या मार्गावरील सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत ठोस निर्णय झालेला नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रालगत तसेच चंद्रपूर प्रादेशिक वन व वनविकास महामंडळाच्या जंगलालगत हा महामार्ग जात असल्यामुळे वन्यजीव वारंवार रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेचे बळी ठरत आहेत.
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीकडून या महामार्गावरील वन्यजीव अपघातांची सातत्याने नोंद ठेवली जात असून, अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून शासनाला उपशमन उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. संस्थेने राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, धानोरा (मुख्यालय – चंद्रपूर) यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात ‘फॉरेस्ट प्री-कन्स्ट्रक्शन अॅक्टिव्हिटी’ अंतर्गत वन्यजीव संरक्षणासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे विभागाने कळविले होते. प्रस्ताव मंजूर होताच वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रात ‘मिटिगेशन मेजर्स’ अर्थात उपशमन उपाययोजना राबविण्यात येतील, असेही आश्वासन देण्यात आले होते. मात्र २०२६ चे अर्धे वर्ष उलटूनही या संदर्भात कोणतीही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वन्यजीव संवर्धनासाठी महामार्गांवर तातडीने प्रभावी उपशमन उपाययोजना, वेगमर्यादेची कडक अंमलबजावणी, वन्यजीव क्रॉसिंग, चेतावणी फलक आणि संरक्षक कुंपण उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, नाजिश अली, इमरान खान तसेच चिचपल्ली वनक्षेत्राचे वनरक्षक अनिल नालमवाड, वनमजूर विकास निकोडे आणि शंभू मडावी उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






