पोंभुर्णा: Pombhurna Crime News: पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादाचे पर्यावसान रक्तरंजित संघर्षात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक न्यायालयातील वैवाहिक वादाचा राग मनात धरून एका ३६ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून पोंभुर्णा पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या साथीदारांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. (चंद्रपुरात डीजे फुल व्हॉल्युम, पोलिसांची कारवाई, वाचा डीजेची बातमी)
वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून थेरगाव रस्त्यावर हल्ला (Pombhurna Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, जामतुकुम येथील रहिवासी संदीप तुकाराम कोमलवार (वय ३६) यांचा २०२० मध्ये कोमल हिच्यासोबत विवाह झाला होता. मात्र, शंका-कुशंकेवरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने गेल्या वर्षापासून त्यांची पत्नी चंद्रपूर येथील माहेरी निघून गेली होती. सध्या या दांपत्याचा बल्लारपूर न्यायालयात पोटगीचा खटला सुरू आहे. २१ सप्टेंबर रोजी या खटल्याची तारीख असल्याने संदीप कोमलवार हे आपल्या दुचाकीने बल्लारपूर येथे गेले होते. काम आटोपून सायंकाळी पाचच्या सुमारास घरी परतत असताना येनबोळी येथील एका हॉटेलजवळ त्यांना त्यांची पत्नी, मुले, मेहुणा चेतन आणि साळपिंडूचा मामा हुसेन चंचलवार हे नाश्ता करताना दिसले. संदीप यांनी आपल्या मुलाला नाश्ता देण्याचा प्रयत्न केला असता, पत्नीने मुलाला दूर नेले. यावरून तिथे बाचाबाची झाली आणि मेहुणा व त्याच्या मामाने संदीप यांना धक्काबुक्की केली.
न्यायालयातील तारखेवरून वाद आणि येनबोळीतील बाचाबाची
या वादानंतर संदीप यांनी हुसेन चंचलवार यांचा मुलगा किरण चंचलवार याला फोन करून वडिलांच्या वर्तनाबद्दल जाब विचारला. यावर किरणने वाद मिटवण्याच्या बहाण्याने संदीप यांना थेरगाव रस्त्यावरील बारजवळ दारू पिण्यासाठी बोलावले. रात्री सातच्या सुमारास संदीप तिथे पोहोचले असता, दोन दुचाकींवरून आलेल्या किरण चंचलवार आणि त्याच्या दोन साथीदारांनी मागून अचानक हल्ला चढवला. त्यांना गाडीवरून खाली पाडून जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यादरम्यान संदीप यांना पत्नीचा आवाजही ऐकू आल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. मारहाणीत संदीप यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
गंभीर जखमी झालेल्या संदीप यांनी तिथून पळ काढला आणि समोरून येणाऱ्या वाहनधारकांकडे मदतीची याचना केली, मात्र रक्ताने माखलेल्या अवस्थेतील तरुणाला पाहून कोणीही मदत केली नाही. अखेर संदीप यांनी स्वतःची दुचाकी चालवत देवाडा गाठले आणि तेथील एका व्यक्तीच्या वाहनाने जामतुकुम येथील आपले घर गाठले. गावकऱ्यांनी तत्काळ ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले.
पोंभुर्णा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमी संदीप यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संदीप कोमलवार यांच्या तक्रारीवरून पोंभुर्णा पोलीस ठाण्यात आरोपी किरण चंचलवार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नरेश निमगडे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






