मुल – मुल कृषी महाविद्यालय विकासासाठी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्याधुनिक ‘कृषी ज्ञानसंकुल’ निर्माण करण्याचा संकल्प मांडला आहे. महाविद्यालयाला भेट देत त्यांनी प्रयोगशाळा, ग्रंथालय, पॉलीहाऊस आणि परिसराची सविस्तर पाहणी केली. शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना जागतिक कृषी विद्यापीठांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी टू-वे कम्युनिकेशन व्यवस्था उभारण्याची सूचना त्यांनी दिली. या विकासाबाबत ५ ऑक्टोबरला कृषिमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. (डायलेसिस केंद्राचे लोकार्पण, वाचा महत्वाची बातमी)
मुल येथील कृषी महाविद्यालयाला भेट देत आ. मुनगंटीवार यांनी विविध प्रयोगशाळा, ग्रंथालय, पॉलीहाऊस तसेच महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी केली. यावेळी पी.डी.के. व्ही. अकोलाचे उपकुलसचिव डॉ. एस. एस. चव्हाण,सहयोगी प्राध्यापक तथा प्राचार्य कृषी महाविद्यालय डॉ. विलास अतकारे, भाजपा मुल शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, सहयोगी संशोधन संचालक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, संतोष भावदे, सहायक प्राध्यापक डॉ. विशाखा डोंगरे, सहाय्यक प्राध्यापक शाम पतींगे, आर्किटेक चिन्मय पाटील आदींची उपस्थिती होती.
मुल कृषी महाविद्यालय विकासाचा नेमका संकल्प काय?
आ . सुधीर मुनगंटीवार यांनी महाविद्यालयाच्या दृष्टीने बांधकामासाठी नवीन डिझाईन तयार करताना विद्यमान नकाशामध्ये आवश्यक फेरबदल करता येतील का, याचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महाविद्यालयाची भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रेझेंटेशन हॉल, कृषी विषयक ई-लायब्ररी, तसेच जगातील कृषी विद्यापीठांशी थेट संवाद साधता यावा यासाठी टू-वे कम्युनिकेशन व्यवस्था उभारण्याची गरज आ.मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली.
महाविद्यालयाच्या सुविधांची सविस्तर पाहणी
कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील प्रत्येक घटक विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा स्रोत ठरावा, अशी संकल्पना आ. मुनगंटीवार यांनी मांडली. कृषीविषयक माहिती देणारे साईन बोर्ड, विविध वृक्षांजवळ क्यूआर कोडच्या माध्यमातून त्या वृक्षाची संपूर्ण माहिती, तसेच शेती क्षेत्राशी संबंधित विविध बाबींची माहिती विद्यार्थ्यांना एकाच परिसरात उपलब्ध व्हावी, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आ.मुनगंटीवार यांनी केल्या.
मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी उपलब्ध जागेची पाहणी करून त्याचे योग्य नियोजन करण्यास सांगतानाच वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या तपासण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महाविद्यालयातील रिक्त पदांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. इमारतीला आवश्यक रंगरंगोटी करण्यासह संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठेवण्याच्या सूचना आ.मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षाही त्यांनी जाणून घेतल्या.
कृषिमंत्र्यांसोबत ५ ऑक्टोबरची बैठक आणि पुढील योजना
कृषी महाविद्यालयाच्या पुढील विकासाबाबत ५ ऑक्टोबर रोजी कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. तसेच कृषिमंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर निमंत्रित करून अजयपूर येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्राची पाहणी घडवून आणण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी पीडीकेव्ही आणि कृषी महाविद्यालयाने संयुक्तपणे सविस्तर प्रेझेंटेशन तयार करण्याच्या सूचनाही आ. मुनगंटीवार यांनी केल्या.
चंद्रपूर जिल्ह्याच्या कृषी सामर्थ्याला व्यापक व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट’मध्ये धान पिकाचा समावेश करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या माध्यमातून सीड स्टोरेज अर्थात पारंपरिक व महत्त्वपूर्ण बियाण्यांचे संवर्धन, जनुक संकलन व संशोधन, टिश्यू कल्चर, नर्सरी विकास यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष देण्याची गरज आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.रेन वॉटर हार्वेस्टिंग, विविध गाईंच्या प्रजाती, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पिकांची विविधता, संशोधन आणि स्थानिक कृषी परंपरा यासह शेतीशी निगडित प्रत्येक महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळावी, अशी व्यापक संकल्पना आ. मुनगंटीवार यांनी मांडली.
शेतीच्या मातीशी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाशी नाते जपणारी त्यांची ही भूमिका या पाहणीतून पुन्हा अधोरेखित झाली. कृषी शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे माध्यम न राहता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारे, नव्या तंत्रज्ञानाला दिशा देणारे आणि संशोधनातून ग्रामीण विकासाला बळ देणारे केंद्र बनावे, यासाठी आ. मुनगंटीवार यांनी घेतलेला हा पुढाकार मुलच्या कृषी महाविद्यालयाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






