चंद्रपूर / मुंबई: मुल एसटी बस आगार उभारणीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. आगारासाठी १४.९९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंत्रालयात यासंदर्भात बैठक पार पडली. आगारासाठी शहराजवळ चार एकर जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. (चंद्रपुरात व्यापाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा, वाचा सविस्तर)
मुल एसटी बस आगार उभारणीसाठी १४.९९ कोटींचा प्रस्ताव
मुल शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधांना अधिक बळकटी मिळावी आणि मंजूर एसटी बस आगार लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पुढाकार घेतला आहे. बस आगाराच्या प्रत्यक्ष उभारणीतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर करून कामाला गती देण्याच्या दृष्टीने मंत्रालयात परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी आगारासाठी शहराच्या जवळ आणि प्रवाशांच्या सोयीची चार एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आ. मुनगंटीवार यांनी दिली, तर आगाराच्या उभारणीसाठी १४.९९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या वतीने सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले.
या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरचे विभागीय नियंत्रक, प्रादेशिक अभियंता दिनेश महाजन, वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख, नितीन माईंद यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मुल येथे यापूर्वीच मंजूर झालेल्या एसटी बस आगाराच्या जागेची उपलब्धता, बांधकाम आराखडा आणि निधीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुलच्या विकासासाठी निधीची कमतरता आड येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडत या कामासाठी आवश्यक असलेला उर्वरित निधी आमदार निधीतून उपलब्ध करून देण्याची तयारीही आ. मुनगंटीवार यांनी दर्शवली. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात आणि बस आगाराचे काम वेगाने मार्गी लावावे, अशा स्पष्ट सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिल्या. (मुल एसटी बस आगार)
सक्षम सार्वजनिक वाहतुकीतून प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा (मुल एसटी बस आगार) मुल येथे एसटी बस आगार प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर बसफेऱ्यांचे नियोजन अधिक सुटसुटीत होणार असून, शहर व ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळण्यास मोठी मदत होईल. विशेषतः शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि दैनंदिन कामांसाठी प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांना मुल शहराशी आणि पुढे जिल्ह्यातील व राज्यातील इतर महत्त्वाच्या केंद्रांशी जोडणारी वाहतूक व्यवस्था यामुळे अधिक भक्कम होणार आहे.
विकासकामांतून बदलतोय मुल तालुक्याचा चेहरामोहरा (मुल एसटी बस आगार) आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुल तालुक्याच्या विकासाला सर्वच क्षेत्रांत नवी दिशा मिळाली आहे. मुल शहरातील मुख्य रस्ता, कर्मवीर मा. सा. कन्नमवार सभागृह, तहसील कार्यालय, पंचायत समितीची नवीन इमारत, पाणीपुरवठा योजना, भव्य स्टेडियम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क, स्विमिंग टँक आणि सुसज्ज आठवडी बाजार यांसारख्या कामांनी शहराच्या नागरी सुविधांमध्ये मोठी भर घातली आहे.
यासोबतच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही क्रांतिकारी पावले उचलली गेली असून, १०० खाटांच्या मुल उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर आहे. सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय उभे राहत असून, मुल येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाला मान्यता मिळाली आहे, तर मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शूरवी महाविद्यालयही सुरू करण्यात आले आहे. रस्ते, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण अशा चौफेर विकासकामांमुळे मुल तालुक्याचे रूप पालटत असून, बस आगाराच्या निर्णयाने या विकासप्रक्रियेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






