चंद्रपूर : Chandrapur Bamboo Week 2026 अंतर्गत चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे दुसऱ्या दिवसाचे सत्र पार पडले. बांबू आधारित उद्योगांना भविष्यात मोठा वाव आहे. यासाठी वन विभाग, संशोधन संस्था, उद्योग व शेतकरी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. असे मत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी मांडले. (हे हि वाचा – चंद्रपुरात स्वच्छता हि सेवा अभियानाला सुरुवात)
बांबूकडे केवळ लागवड म्हणून पाहू नये. तो शाश्वत उपजीविकेचे साधन आहे. त्यातून स्थानिक रोजगार वाढतो. शिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थाही बळकट होते.
Chandrapur Bamboo Week 2026 मध्ये बांबू उद्योगाच्या भविष्यावर चर्चा
बांबू आधारित उद्योगांना भविष्यात मोठा वाव असून, या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी वन विभाग, संशोधन संस्था, उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्र, शेतकरी आणि स्थानिक समुदाय यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक आहे. बांबू विकासाकडे केवळ लागवड व उत्पादनाच्या दृष्टीने न पाहता शाश्वत उपजीविका, स्थानिक रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे साधन म्हणून पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी केले.
चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे दुसऱ्या दिवसाचे सत्र कसे पार पडले
‘बांबू फॉर द फ्युचर फ्रॉम ट्रॅडिशन टू इनोव्हेशन’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक बांबू सप्ताह–२०२६’च्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
दि. १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित या सप्ताहाचा उद्देश बांबूला पारंपरिक वापरापुरते मर्यादित न ठेवता विज्ञान, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास, मूल्यवर्धन आणि नवोपक्रमाशी जोडणे हा आहे. दुसऱ्या दिवसाच्या विविध सत्रांमध्ये वन विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैज्ञानिक, संशोधक, प्राध्यापक, उद्योजक आणि बांबू क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्लीचे संचालक तथा चंद्रपूर वन प्रबोधिनीचे अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा, निरी नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लाल सिंग, न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा. लि., भद्रावतीचे वरिष्ठ व्यवस्थापक (स्ट्रॅटेजी) आयुष राज सिन्हा, एसएमएमसीए नागपूरच्या आर्किटेक्चर विभागाच्या प्राध्यापक डॉ. तारिका दगडकर, चंद्रपूर वन प्रबोधिनीचे उपसंचालक विश्वनाथ चव्हाण, हनुमंत जाधव, अश्विनी जाधव, सत्र संचालक संभाजी गवळी व रामदास पुजारी, बीआरटीसीचे वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे तसेच ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशन, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव मोगरेकर आदी उपस्थित होते.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीचे उपक्रम कोणते
प्रास्ताविकात उमेश वर्मा यांनी जागतिक बांबू सप्ताहाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करून बीआरटीसीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आयुष राज सिन्हा यांनी शाश्वत बांबू विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भविष्यातील संधींवर प्रकाश टाकला. संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष उद्योग आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी दुवा निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. लाल सिंग यांनी बांबूच्या माध्यमातून पर्यावरण पुनर्स्थापना आणि परिसंस्था संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. पर्यावरणीय आणि आर्थिक गरजांचा समतोल साधण्यासाठी बांबूचा अधिक प्रभावी वापर करता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशनचे सीईओ वैभव मोगरेकर यांनी ‘मूल्यवर्धनातून बांबूला नवी दिशा’ या विषयावर मार्गदर्शन केले.
याशिवाय संजीवनी ॲग्रो मशिनरी, नागपूरचे अनिल चौक, बिलासपूरच्या डॉ. गुंजन पाटील, नागालँडचे डॉ. भूपेश गिरीधरण आणि तेलंगणाचे श्रवण कुमार चिवुकुला यांनी ऑनलाइन माध्यमातून बांबू क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन बीआरटीसीच्या पर्यवेक्षिका योगिता साठवणे आणि विभागप्रमुख सुमेध लिचडे यांनी केले. निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी यांनी आभार मानले. यावेळी डॉ. आंबेडकर महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, सुशिलाबाई मामीदवार सोशल वर्क कॉलेज, जनता महाविद्यालय, एफईएस गर्ल्स कॉलेज आणि राजीव गांधी कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






