जिवती : Jivati Bamboo Plantation News समोर आली असून जिवती तालुक्यातील महापांढरवाणीच्या आदिवासी बांधवांनी आदर्श निर्माण केला आहे. जून महिन्यात अवघ्या २० ग्रामस्थांपासून सुरू झालेला हा श्रमदान उपक्रम आता २०० लोकांपर्यंत पोहोचला आहे. या उपक्रमाच्या अकराव्या आठवड्यात गावकऱ्यांनी घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड केली. वनसंपत्तीचे संरक्षण करून गावातच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा ग्रामस्थांचा ठाम संकल्प आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील ४ वर्षीय अधीर श्रीलंकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व)
सामूहिक वनहक्क (CFR) क्षेत्राच्या संरक्षणासाठी ग्रामसभेने कंपाऊंड करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. गावकऱ्यांच्या या पर्यावरण चळवळीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात २० ग्रामस्थांपासून सुरू झालेल्या श्रमदान उपक्रमात आता २०० हून अधिक ग्रामस्थ सहभागी झाले असून, अकराव्या आठवड्यात बांबू लागवड व वृक्षसंवर्धनाचे काम करण्यात आले. वनसंपत्तीचे संरक्षण आणि त्यातून गावात रोजगारनिर्मिती करण्याचा ग्रामस्थांचा संकल्प आहे.
जिवतीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल महापांढरवाणी येथे वृक्षलागवड, बांबू लागवड, बांबूच्या थावड्या तयार करणे आणि वृक्षरक्षण बंधन असे उपक्रम श्रमदानातून सुरू आहेत. या चळवळीत अनिल आळे, सीताराम आळे, मोहन आत्राम, तुकाराम धुर्वे, बादू आळे, जैतू जुमनाके यांच्यासह सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे.
CFR क्षेत्र संरक्षणासाठी पुढाकार
लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी बाराव्या आठवड्यात कंपाऊंड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण CFR क्षेत्रामध्ये कंपाऊंड करण्याचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे. यासंदर्भात सामूहिक वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी माननीय गट विकास अधिकारी (BDO) यांना निवेदन दिल्याचे सांगण्यात आले.
रोजगारासाठी VB-G RAM G योजनेचे मार्गदर्शन
ग्रामस्थांना गावातच रोजगार मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायत येरमी-येसापूरचे ग्रामसेवक श्री. नगराळे व रोजगारसेवक श्री. केशव कुमरे यांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली.
गावपाटील श्री. मानकु धुर्वे यांनी गावाला रोजगार मिळण्याची गरज व्यक्त केली, तर सौ. अनिता धुर्वे यांनीही रोजगाराची मागणी केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरमी-येसापूरचे मुख्याध्यापक श्री. लिंगोराव सोयाम यांनी VB-G RAM G योजनेतून रोजगार मिळविण्यासाठी कामाची मागणी अर्जाद्वारे करण्याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ समाजसेवक व पेसा अभ्यासक श्री. संतोषजी सलाम यांनी योजनेची प्रक्रिया, ग्रामसभेची भूमिका तसेच वनसंवर्धनातून रोजगारनिर्मितीबाबत माहिती दिली.
यानंतर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत घनदाट जंगल परिसरात श्रमदानातून बांबू लागवड करण्यात आली.
महापांढरवाणी ग्रामस्थांनी वनसंवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. आता त्यांच्या श्रमाला रोजगाराची जोड देण्याची गरज आहे. “आम्ही श्रमदानाला तयार आहोत; शासनाने आमच्या हाताला काम द्यावे,” हीच ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






