Sudhir Mungantiwar Mahila Melava speech at Chandsurla in Chandrapur district

आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन; महिलांची बचत ही संकटातील खरी आर्थिक ताकद, आधुनिक उद्योग उभारा!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 6, 2026

चंद्रपूर : Sudhir Mungantiwar Mahila Melava कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महिलांच्या आर्थिक बचतीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे भाष्य केले. महिलांची बचत ही कुटुंबाची खरी आर्थिक ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चांदसुर्ला (खैरगार) येथे रक्षाबंधनानिमित्त भव्य महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. या वेळी गावातील शेकडो महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांनी पारंपरिक व्यवसायांच्या पलीकडे जाऊन आधुनिक कौशल्याधारित उद्योग उभे करावेत, असे आवाहन मुनगंटीवार यांनी या वेळी केले. (हे हि वाचा – चंद्रपुरातील अधीर करणार देशाचे प्रतिनिधित्व)

Sudhir Mungantiwar Mahila Melava : चांदसुर्ला येथे महिलांची उपस्थिती

महिलांची बचत ही त्यांच्या कष्टातून, काटकसरीतून आणि दूरदृष्टीतून उभी राहिलेली आर्थिक ताकद आहे. संकटाच्या काळात कुटुंबाला आधार देणाऱ्या या बचतीला महिलांच्या कर्तृत्वाची आणि कौशल्याची जोड मिळाली, तर नारीशक्तीच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी उंची मिळू शकते. महिलांमध्ये प्रचंड क्षमता आणि कर्तृत्व असून, त्यांना योग्य संधी व आर्थिक बळ मिळाले तर त्या कुटुंबासोबतच संपूर्ण समाजाच्या प्रगतीलाही नवी दिशा देऊ शकतात, असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसायांच्या पलीकडे जाऊन आधुनिक कौशल्याधारित उद्योग उभे करावेत आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

चांदसुर्ला (खैरगार), ता. जि. चंद्रपूर येथे रक्षाबंधनानिमित्त आयोजित महिला मेळाव्याला भाजपाचे नेते अनिल डोंगरे, मंडळ अध्यक्ष हनुमान काकडे,जिल्हा महामंत्री लक्ष्मीताई सागर, सरपंच माधुरीताई सागोरे, किरणताई डोंगरे,शोभाताई पिदुरकर, अर्जुनराव नागरकर, अनिताताई भोयर, बापूरावजी डाखरे, रघुनाथ नागरकर, संजय सांगूळवडे, सूरज गौरकर, जयेंद्र ताजने, संगीता हेलवडे, प्रियंका जाधव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा देताना आ.मुनगंटीवार म्हणाले, सर्व लाडक्या बहिणींच्या जीवनात आनंद, सुख आणि समाधान नांदावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी शक्तिदायनी,तेजोदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो.

महिलांची बचत ही संकटाच्या काळात कुटुंबाची खरी आर्थिक ढाल

महिलांच्या बचतीचे महत्त्व अधोरेखित करताना आ.मुनगंटीवार म्हणाले, मोठमोठ्या बँका अर्थव्यवस्थेला आधार देतात; पण घरावर अचानक संकट आले, तर त्या संकटातून कुटुंबाला सावरणारी पहिली ताकद अनेकदा महिलेची बचत असते. त्यामुळे महिलांची बचत ही कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता आहे. महिला बचत गटांनी पापड, कुरडया यांसारख्या पारंपरिक उपक्रमांपुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य आणि बाजारपेठेचा उपयोग करून मोठे उद्योग उभारावेत. महिलांमध्ये क्षमता कमी नाही; गरज आहे ती संधीची. ‘आपण काहीतरी मोठे करू शकतो’ हा आत्मविश्वास प्रत्येक महिलेने मनात निर्माण केला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

गावातील आवश्यक कामांची यादी करा, गावात बैठक घ्या आणि ती कामे मार्गी लावण्यासाठी पूर्ण शक्तीने मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ठाम ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जीवनातील सकारात्मकतेचा संदेश देताना मुनगंटीवार यांनी ‘सूरज ना बन पाये तो दीपक बनके जलता चल’ या ओळींचा संदर्भ दिला.आपण सूर्य होऊ शकलो नाही, तरी एक दिवा होऊ शकतो. आपल्या आयुष्यातील आग दुसऱ्याचे घर जाळणारी नसावी; ती एखाद्याच्या आयुष्यातील अंधार दूर करणारी ज्योत असावी. दुसऱ्याच्या प्रगतीचा मत्सर करण्यापेक्षा त्याच्या वाटेला प्रकाश देण्याचा प्रयत्न केला पाहिजे,असे ते म्हणाले.गावाच्या विकासासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आपण सगळे एकत्र आले पाहिजे. आपल्या हक्काची आणि विकासाची मशाल प्रत्येकाने हातात घेतली पाहिजे,असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

संजय गांधी निराधार योजनेतील मानधनवाढीसाठी आपण सातत्याने आणि आग्रही पाठपुरावा केला असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. अर्थमंत्री असताना मानधन वाढविण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे सतत आग्रह धरला. सहाशे रुपयांवरून बाराशे आणि त्यानंतर पंधराशे रुपयांपर्यंत मानधन वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.यासोबतच कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला गंभीर आजार झाल्यास संपूर्ण कुटुंब आर्थिक आणि मानसिक संकटात सापडते. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने बाधित कुटुंबांनाही निराधार योजनेच्या माध्यमातून मदत मिळावी, यासाठीही आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यातून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment