Bhadrawati Illegal Liquor Seized Swift Car Police Action

नाकाबंदी तोडून पळालेली स्विफ्ट कार पकडली, ८.३६ लाखांची अवैध दारू जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 30, 2026

भद्रावती – Bhadrawati Illegal Liquor Seized Swift: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांनी अवैध दारू तस्करांविरोधात मोठी कारवाई करत घोडपेठ शिवारात स्विफ्ट कारसह लाखो रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. नागपूरवरून चंद्रपूरच्या दिशेने कारमधून दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० जुलै रोजी भद्रावती टप्पा येथे तातडीने नाकाबंदी लावली. (हे हि वाचा – बॉम्बने उडवून देईन, डॉक्टरांना धमकी)

नागपूर-चंद्रपूर मार्गावर पोलीस कारवाई

नाकाबंदीदरम्यान संशयित पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्रमांक MH-04-HF-1208) येताना दिसली. मात्र पोलिसांनी इशारा केला असतानाही कार चालकाने वाहन न थांबवता चंद्रपूरच्या दिशेने वेगाने पळवून नेले. यामुळे सतर्क झालेल्या भद्रावती पोलिसांच्या पथकाने पोलीस स्टॉपच्या मदतीने तात्काळ त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.

पोलिसांना पाहून कार चालकाने वाढवला वेग आणि केला पाठलाग

तस्कराने पोलिसांपासून वाचण्यासाठी कार मौजा घोडपेठ गावाच्या दिशेने वळवली. त्यानंतर त्याने वस्तीमध्ये गाडी सोडून पळ काढला. पोलिसांनी परिसरात कसून शोध घेतला असता मौजा घोडपेठ येथील शंकर हेअर सलून समोर एक स्विफ्ट कार संशयास्पदरित्या उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांचे पथक तात्काळ त्या गाडीजवळ पोहोचले.

गाडीजवळ कोणीही चालक नसल्याने पोलिसांनी काचांतून टॉर्च लावून पाहणी केली. तेव्हा कारच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचे बॉक्स दडवून ठेवल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी वाहनाची पाहणी करून संपूर्ण साठा ताब्यात घेतला. या कारवाईत पोलिसांनी ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारूचे एकूण ४१ बॉक्स जप्त केले.

या जप्त केलेल्या साठ्यामध्ये १८० मिलीच्या १७२८ निप्पा (किंमत २ लाख ९५ हजार ४८८ रुपये) आणि ९० मिलीच्या ४८० निप्पा (किंमत ४१ हजार २८० रुपये) असा ३ लाख ३६ हजार ७६८ रुपयांचा दारूचा साठा आढळला. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट कार असा एकूण ८ लाख ३६ हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलीस हवालदार देवानंद डुकरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकाविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७१०/२६ अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. संतोष केदार, पो.उप.नि. गजानन तुपकर, सफौ. महेन्द्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्तूनकर, देवानंद डुकरे, गोपाळ आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे आणि संतोष राठोड यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment