Korpana Theft Threat Case Complaint at Korpana Police Station

“बॉम्बने उडवून देईन!” कोरपना डॉक्टरांना मिस्त्रीची धक्कादायक धमकी!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 30, 2026

चंद्रपूर: Korpana Theft Threat Case प्रकरणात कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जिवने यांच्या घरातील १ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. फर्निचर काम करणाऱ्या मिस्त्रीने ही चोरी केली आहे. आरोपीने डॉक्टरांना अश्लील शिवीगाळ करत बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोरपना पोलीस ठाण्यात आरोपी राजू विश्वकर्मा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (हे हि वाचा – बल्लारपुरात एमडी ड्रग्स जप्त, २ अल्पवयीन मुले ताब्यात)

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आकाश जिवने हे मागील १५ वर्षांपासून कोरपना येथे वास्तव्यास असून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांनी आपल्या घराच्या फर्निचरचे काम करण्यासाठी चंद्रपूर येथील आर्किटेक्चर इंजिनिअर धीरज वासनिक यांना कंत्राट दिले होते. धीरज वासनिक यांनी फर्निचरच्या कामासाठी राजू अर्जुन विश्वकर्मा (रा. कोरपना) या मिस्त्रीला पाठवले होते. राजू हा गेल्या दोन महिन्यांपासून डॉ. जिवने यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर फर्निचरचे काम करत होता आणि तिथेच राहतही होता.

आलमारीच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले १ लाख रुपये गायब

दरम्यान, २३ जुलै रोजी इंजिनिअर धीरज वासनिक यांनी कामाच्या मोबदल्यात १ लाख रुपयांची मागणी केली होती आणि ते २५ जुलै रोजी पैसे नेण्यासाठी येणार होते. त्यानुसार २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास डॉ. जिवने यांनी १ लाख रुपये नगदी आपल्या इमारतीतील आलमारीच्या ड्राव्हरमध्ये ठेवले. हे पैसे समोरच उपस्थित असलेल्या राजू विश्वकर्मा याच्याकडे सुपूर्द करत धीरज वासनिक आले की त्यांना देण्यास सांगून डॉक्टर रुग्णालयात निघून गेले. त्यानंतर सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास डॉक्टर घरी परतले असता ड्राव्हरमधील १ लाख रुपये गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ इंजिनिअर वासनिक यांना विचारणा केली असता त्यांनी अजून कोरपना येथे आलो नाही आणि पैसे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर डॉक्टर जिवने यांनी राजू विश्वकर्मा याला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद येत होता.

“बॉम्बने उडवून देईन”; मिस्त्रीने दिली जीवे मारण्याची धमकी

या घटनेनंतर डॉक्टरांनी कोरपना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी तक्रार दिली. पोलिसांनी २६ जुलै रोजी राजू विश्वकर्मा आणि इंजिनिअर धीरज वासनिक यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. त्यावेळी इंजिनिअरच्या समोरच राजू विश्वकर्मा याने डॉ. जिवने यांना “मी तुझे पैसे चोरले असते तर परत कामावर आलो असतो का? तुला कापून फेकून देईन आणि बॉम्बने उडवून देईन” अशी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी इंजिनिअर वासनिक यांनी मध्यस्थी करत त्याला शांत केले. राजू याने उर्वरित फर्निचरचे काम करून पैसे चुकवतो असे स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची तयारी दर्शवली आणि त्या रात्री इमारतीतच मुक्काम केला. मात्र, २७ जुलै रोजी सकाळीच तो कोणालाही काही न सांगता पसार झाला.

त्यानंतर २८ जुलै रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास आरोपी राजू विश्वकर्मा याने डॉ. जिवने यांच्या व्हॉट्सॲपवर व्हॉईस मेसेज पाठवला. त्या मेसेजमध्ये त्याने, “माझ्यावर चोरीचा आळ आणतो काय, माझी सरकारी ओळखपत्रावरील पत्त्याची माहिती बनावट आहे, आता शोधून दाखव, मी तुझे १ लाख रुपये काढून घेऊन गेलो आणि तुझी नोकरीही घालवीन” अशा अत्यंत अश्लील भाषेत धमक्या दिल्या. या सर्व प्रकारानंतर डॉ. आकाश जिवने यांनी २९ जुलै रोजी कोरपना पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजू अर्जुन विश्वकर्मा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३५१(२) आणि २९६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणेदार लता वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश वाकुलकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment