Chandrapur Job Fraud Case FIR at Shegaon Police Station

आरोग्य विभागात नोकरीचे आमिष! चिमूरच्या तरुणांची फसवणूक कशी झाली?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 30, 2026

शेगाव – Chandrapur Job Fraud Case प्रकरणी आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. चिमूर तालुक्यातील दोन तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन १ लाख २० हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पीडित तक्रारदाराच्या अर्जावरून शेगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. (हे हि वाचा – सराईत गुन्हेगाराकडे आढळले एमडी पावडर, गुन्हे शाखेची कारवाई)

चिमूर तालुक्यातील दोन तरुणांची १ लाख २० हजारांची फसवणूक

याप्रकरणी रमेश कोंडबाजी लाडसे यांच्या तक्रारीवरून शेगाव पोलीस ठाण्यात आरोपी अनिल कैकडू महाडोळे, भारत दीपक खाडीलकर आणि विलास गुरनुले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रमेश लाडसे यांचा मुलगा आतिष लाडसे (वय २३) हा नागपूर येथे खाजगी काम करतो, तर गावातीलच कुंदन विजय घुगरे हा तरुण नोकरीच्या शोधात होता. पंचायत समिती चिमूर येथे ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेला आरोपी अनिल महाडोळे हा ऑगस्ट २०२५ मध्ये बोथली ग्रामपंचायतीत ऑडिटच्या कामासाठी आला असताना त्याची कुंदन घुगरे याच्याशी ओळख झाली. अनिल महाडोळे याने प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर महाडोळे याने तक्रारदाराची चंद्रपूर येथील विलास गुरनुले याच्याशी फोनवरून ओळख करून दिली आणि सुरुवातीला फोनपे द्वारे २० हजार रुपये उकळले.

पुन्हा पैसे उकळून टाळाटाळ; आरोपींचे पितळ उघडे

त्यानंतर १० सप्टेंबर २०२५ रोजी तक्रारदार आणि कुंदन घुगरे हे चंद्रपूर येथे विलास गुरनुले आणि भारत खाडीलकर यांना भेटले. आरोपींनी नोकरीचा तात्काळ ऑर्डर देण्याचे आश्वासन देऊन ८० हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्याच दिवशी आरोपी भारत खाडीलकर याने आतिष लाडसे याच्या नावाने ग्रामीण रुग्णालय चिमूर आणि कुंदन घुगरे याच्या नावाने प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी येथे रुजू होण्याचे बनावट जॉइनिंग लेटर दिले. दोन दिवसांत प्रत्यक्ष येऊन रुजू करून देतो असे सांगून आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर पुन्हा ३ नोव्हेंबर २०२५ रोजी जॉइनिंग लेटर तयार करण्याचे कारण सांगून आणखी २० हजार रुपये उकळले.

वारंवार पाठपुरावा करूनही नोकरी न मिळाल्याने आणि दिलेले जॉइनिंग लेटर बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी आपल्या एकूण १ लाख २० हजार रुपयांची मागणी लावून धरली. मात्र आरोपींनी पैसे परत करण्यास साफ नकार देत टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रमेश लाडसे यांनी शेगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी २९ जुलै २०२६ रोजी गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment