चंद्रपूर: पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि आर्थिक हिशोबावरून रेती व्यावसायिकाला बोलावून घेत त्याच्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत बळजोरीने स्टॅम्प पेपरवर लिहून घेतल्याची गंभीर घटना चंद्रपूर तालुक्यातील पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पडोली पोलिसांनी एका मुख्य आरोपीसह साथीदाराविरोधात भारतीय न्याय संहिेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे रेती व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दिपक रंगराव राठोड (वय ४३, रा. धानोली तांडा, ता. कोरपणा, हाल मुक्काम गौरक्षण वार्ड, बल्लारशाह) असे फिर्यादी रेती व्यावसायिकाचे नाव असून त्यांनी यासंदर्भात पडोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. (भांडण सोडवलं आणि झाला हल्ला, बाबुपेठमध्ये दहशत, वाचा बातमी)
पडोलीत रेती व्यावसायिकाला मारहाण: नेमके काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी दिपक राठोड हे मागील अनेक वर्षांपासून रेती ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय करतात. व्यवसायातून त्यांची ओळख भूपेंद्र गुलाबराव मेश्राम (रा. चंद्रपूर) याच्याशी झाली व ते एकमेकांना अडीअडचणीत पैशांची मदत करत असत. तीन महिन्यापूर्वी फिर्यादीने भूपेंद्र मेश्राम याला रेती घाटाच्या कामाकरिता दहा लाख रुपये दिले होते, जे एक ते दीड महिन्यात परत करण्याचे ठरले होते. दरम्यान, २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भूपेंद्र मेश्राम याने फिर्यादीला मोबाईलवर फोन करून तुझे दहा लाख रुपये घेऊन जा, असे सांगत एका ठिकाणचे लोकेशन पाठविले. यावर फिर्यादी आपले मित्र दीपक आसवानी यांच्यासह कारने बिनबा गेट जवळील चाचा का धाबा, चोराळा येथे पोहोचले.
तिथे भूपेंद्र मेश्रामसह पराग बबनराव आँईचवार (रा. चामोर्शी, जि. गडचिरोली), दिनेश श्रीगिरीवार व फिरोज शेख उपस्थित होते. फिर्यादी गाडीतून उतरून त्यांच्याजवळ जाताच, तेथे उपस्थित पराग आँईचवार याने कोणतेही कारण नसताना त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने विरोध केला असता त्याला शिवीगाळ करून “चुप बैठ नही तो जानसे मार दूंगा,” अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर, पराग आँईचवार याच्यासोबत असलेल्या एका अज्ञात इसमाने काठीने फिर्यादीच्या हातावर व मांडीवर बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादीकडे पैशाचा हिशोब मागितला, त्यावर फिर्यादीने मंगेश कदम (रा. नांदेड) याला १० लाख व सचिन गारघाटे (रा. चंद्रपूर) याला १३ लाख रुपये आपल्या मध्यस्थीने पराग आँईचवार याने दिले असल्याचे सांगितले.
स्टॅम्प पेपरवर लिहून घेतल्याचा फिर्यादीचा आरोप
यावर संतापलेल्या पराग आँईचवार याने जे पैसे मध्यस्थीने दिले आहेत, ते आता तू मला दे, असे म्हणत तिथेच बळजोरीने स्टॅम्प पेपर मागवून घेतला व त्यावर फिर्यादीकडून लिहून घेतले. त्यानंतर आरोपींनी बळजबरीने रामनगर येथील अधिवक्ता यांच्याकडे नेऊन तात्काळ नोटरी करून घेतली. या संपूर्ण प्रकारामुळे प्रचंड घाबरलेल्या व मानसिक धक्क्यात गेलेल्या फिर्यादीने घडलेला घटनाक्रम आपल्या मित्रासह रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन सांगितला. तिथून त्यांना घटनास्थळ पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पडोली येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार फिर्यादीने पडोली पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या सर्व प्रकारची सविस्तर तक्रार नोंदवली.
पोलिसांनी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पराग बबनराव आँईचवार आणि त्याच्यासोबतच्या एका अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३(५), ३५२, ३५१(२), ११८(१), ११५(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवानंद सुभाष केकान करीत असून आर्थिक व्यवहारातून घडलेल्या या मारहाण व दमदाटी प्रकरणाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






