चंद्रपूर, दि. २५ नोव्हेंबर: वरोरा मद्य तस्करी प्रकरणात चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात छापा टाकून बनावट मद्यनिर्मिती उघडकीस आणली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने २३ व २४ नोव्हेंबरला दोन कारवाया केल्या. यात तिघांना अटक करण्यात आली असून ४५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. चंद्रपूर विभागाची अशी आंतरजिल्हा कारवाई प्रथमच असल्याचे विभागाने सांगितले. (अस्वलाच्या मृत्यूमुळे उघड झाला भयावह कांड, वाचा बातमी)
वरोरा मद्य तस्करी: बोर्डा चौकात सापळा, दोन वाहने जप्त
चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत थेट नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचलेली एक मोठी साखळी उद्ध्वस्त केली आहे. विशेष म्हणजे, मद्य तस्करीच्या तपासातून दुसऱ्या जिल्ह्यातील बनावट निर्मिती कारखान्यावर पोहोचण्याची आणि अशी आंतरजिल्हा कारवाई करण्याची चंद्रपूर विभागाची ही प्रथमच वेळ ठरली असून, या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक करण्यात आली आहे.
दि. २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री निरीक्षक दत्तात्रय वरठी यांच्या नेतृत्वाखाली वरोरा पथकाने नंदोरी टोल नाका रोडवरील बोर्डा चौक परिसरात सापळा रचून बोलेरो पिकअप आणि टाटा हॅरियर या दोन वाहनांना अडवले. या वाहनांची झडती घेतली असता गोवा बनावटीच्या रॉयल स्टॅग ब्रँडच्या १८० मिलीच्या ७१ बॉक्समधील ३,४०८ बाटल्या आणि २ लिटरच्या १७ बॉक्समधील १०२ बाटल्या असा एकूण ८८ बॉक्स मद्यसाठा जप्त करण्यात आला. सुमारे ११ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या मद्यासह २७ लाख रुपये किमतीची दोन्ही वाहने असा एकूण ३८ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून टाटा हॅरियरचा चालक बादल महादेव विरुटकर (वय २६) याला अटक करून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
अटकेतील आरोपीकडे केलेल्या कसून चौकशीत हा मद्यसाठा नाशिक जिल्ह्यातून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे चंद्रपूर पथकाने २४ नोव्हेंबर रोजी पहाटे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील एका शेतातील टीनाच्या शेडवर छापा टाकला. तेथे बनावट विदेशी मद्य तयार करून त्याचे बॉटलिंग व पॅकिंग सुरू असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत रॉयल स्टॅगच्या १८० मिलीच्या १,९२० भरलेल्या बाटल्या, गोवा निर्मित रॉयल इम्पॅक्टच्या ७५० मिलीच्या १४४ भरलेल्या बाटल्या, रॉयल स्टॅगच्या १,६०० रिकाम्या बाटल्या, मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे ब्लेंड, १० लिटर क्षमतेच्या ड्रममधील बनावट मद्य, प्रिंटेड स्टिकर्स, रिकामे खोके, बुचे, लेबल आणि पॅकिंग साहित्य असा ७ लाख ५३ हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या ठिकाणावरून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून नाशिक विभागाचे ‘सी’ विभाग आणि विभागीय भरारी पथकाने या मोहिमेत सहकार्य केले. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त गणेश पाटील आणि अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, प्रमोद राजोते, सागर धिडशे, हर्षराज इंगळे तसेच जवान किशोर डोंगरे, शुभम गोवारदिपे, मंगेश कुयटे, नितेश घाटे, किशोर पेदुजवार, जगदिश मस्के आणि वाहनचालक विलास महाकुलकर, प्रविकांत निमगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करत असून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात अशीच कठोर मोहीम पुढेही सुरू राहील, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






