राजुरा – : राजुरा तालुक्यात (Rajura Power Theft Case) महावितरण कंपनीच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. आर्वी गावात बेकायदेशीरपणे लघुदाब वीज वाहिनीवर थेट वायरद्वारे आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या एका ग्राहकाविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (बेवारस वाहनात लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त)
Rajura Power Theft Case : काय आहे संपूर्ण प्रकरण?
महावितरण कंपनी मर्यादितच्या राजुरा शहर उपविभागांतर्गत येणाऱ्या आर्वी गावात बेकायदेशीरपणे वीज चोरी करणाऱ्या एका ग्राहकाविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या पथकाने गावात केलेल्या दैनंदिन निरीक्षण मोहिमेदरम्यान ही कारवाई केली. आरोपीने वीज वितरण करणाऱ्या लघुदाब वीज वाहिनीवर थेट वायरद्वारे हुक (आकडा) टाकून वीज चोरी केल्याचे उघडकीस आले असून, या कारवाईमुळे परिसरात वीज चोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी महावितरण कंपनीचे राजुरा शहर शाखेचे सहाय्यक अभियंता मिथुन महादेव मेश्राम (वय ३६) यांनी राजुरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर्वी येथील रहिवासी आरोपी मधुकर व्यंकाजी आईलवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. महावितरणचे पथक १६ मे २०२६ रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास आर्वी गावात वीज वाहिन्यांच्या आणि जोडण्यांच्या दैनंदिन निरीक्षणासाठी गेले होते. यावेळी आरोपी मधुकर आईलवार याने स्वतःच्या फायद्यासाठी महावितरणच्या अधिकृत लघुदाब वाहिनीवरून बेकायदेशीररीत्या वायर टाकून वीज चोरी केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
पथकाने घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असता, सदर वीज चोरीचा एकूण भार ०.४ किलोवॅट (kW) असल्याचे निष्पन्न झाले, ज्याचे एकूण मूल्यांकन ७ हजार ९०० रुपये एवढे करण्यात आले आहे. या चोरीच्या विजेचे मूल्यांकन करून महावितरणकडून संबंधित ग्राहकाला वीजबिल देण्यात आले होते. हे मूल्यांकन बिल भरण्यासाठी वापरकर्त्याला वारंवार मुदतवाढ देखील देण्यात आली होती, परंतु आरोपीने मुदतीत बिलाची कोणतीही रक्कम महावितरणकडे जमा केली नाही. अखेर वीजबिलाचा भरणा न करता सातत्याने वीज चोरीचा प्रकार सुरू ठेवल्याने प्रशासनाने कायदेशीर पाऊल उचलले.
सहाय्यक अभियंता मिथुन मेश्राम यांनी ९ जुलै २०२६ रोजी पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी अहवालावरून, राजुरा पोलिसांनी १० जुलै २०२६ रोजी रीतसर एफआयआर नोंदवला आहे. आरोपी मधुकर व्यंकाजी आईलवार याच्याविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक नितीनकुमार अजबराव चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपासाची जबाबदारी पोलीस शिपाई शंकर आनंदराव येरमे (बकल नं. ९९१) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महावितरणने अशा प्रकारची वीज चोरी करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






