राजुरा वीजचोरी गुन्हा प्रकरणात महावितरणने तपासणी केलेली मुख्य वीजवाहिनी आणि वीजखांब

राजुऱ्यात वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 7, 2026

चंद्रपूर / राजुरा: राजुरा वीजचोरी गुन्हा प्रकरणी पोलिसांनी चार्ली येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही मुख्य वीजवाहिनीवर आकडे टाकून वीज वापरल्याचा आरोप आहे. महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांच्या तक्रारीवरून भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये ही कारवाई झाली. १० जुलै २०२६ रोजी महावितरणच्या पथकाने चार्ली गावात पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार आढळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (विजेच्या वादातून तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला, वाचा हि बातमी)

राजुरा वीजचोरी गुन्हा : चार्ली येथे पाहणीत काय आढळले?

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीच्या राजुरा ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक अभियंता व्यंकटेश किष्टन्ना नरमवार हे १० जुलै २०२६ रोजी आपल्या कर्मचाऱ्यांसह चार्ली गावात थकबाकीदारांच्या आणि वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या दैनंदिन पाहणीसाठी गेले होते. या दरम्यान त्यांनी गावातील उद्धव एस. सोनटक्के यांच्या वीज कनेक्शनची (ग्राहक क्रमांक ४५५८७०००१२०४) तपासणी केली असता, त्यांच्याकडे ७ हजार ५६० रुपयांची जुनी थकबाकी असल्याचे दिसून आले. थकबाकीमुळे महावितरणने त्यांचा वीज पुरवठा आधीच खंडित केला असतानाही, मुख्य लघुदाब वीजवाहिनीवर वायरद्वारे हुक (आकडे) टाकून थेट अनधिकृतपणे वीजचोरी केली जात असल्याचे पाहणीत रंगेहात आढळले.

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित, तरीही आकडे

तपासणीदरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या रकुमाबाई उद्धव सोनटक्के यांनी या विजेचा प्रत्यक्ष वापर संतोष उद्धव सोनटक्के हा करत असल्याचे महावितरणच्या पथकाला सांगितले. महावितरणच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून ०.०७२ किलोवॅट भाराची एकूण १ हजार ३३० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न केले. यानंतर नियमानुसार चोरी केलेल्या विजेचे मूल्यांकन बिल तयार करून वापरकर्त्याला भरण्यासाठी पुरेसा वेळ व मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, वारंवार मुदत देऊनही आरोपीने दंडात्मक वीजबिलाची कोणतीही रक्कम महावितरणकडे जमा केली नाही.

अखेर मुदतीत वीजबिल न भरल्याने आणि बेकायदेशीरपणे वीजचोरी सुरूच ठेवल्याने महावितरणचे सहाय्यक अभियंता व्यंकटेश नरमवार यांनी ६ ऑक्टोबर रोजी राजुरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून राजुरा पोलिसांनी आरोपी संतोष उद्धव सोनटक्के (रा. चार्ली) याच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वीजचोरीसाठी वापरण्यात आलेली वायर जप्त करून महावितरण कार्यालयात जमा करण्यात आली आहे. राजुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पुंडलिक पारचाके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment