राजुरा (चंद्रपूर): Rajura Electric Wire Theft: राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सास्ती फिडर परिसरातून महावितरणच्या विजेच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा राजुरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात कौशल्याने तपास करत बल्लारपूर येथील दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे राजुरा पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. (हे हि वाचा – राजुरा पोलिसांनी जप्त केला गांजा)
कंत्राटदारांच्या संपाचा गैरफायदा घेऊन १.९९ लाखांच्या साहित्याची चोरी
मिळालेल्या सविस्तर बातमीनुसार, राजुरा येथील महावितरण कंपनीचे नोकरदार फिर्यादी व्यंकटेश किष्टय्या नरमवार यांनी २९ जून २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात वीज लाईनच्या साहित्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या कार्यक्षेत्रातील ११ केव्ही सास्ती फिडरवरील काही विद्युत खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. ही लाईन वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) च्या चेकपोस्टच्या पुढील भागात असल्याने महावितरणने त्या दिवशी तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना बंद लाईनबाबत कल्पना दिली होती. मात्र, त्याच कालावधीत महावितरणचे कंत्राटदार संपावर गेल्यामुळे पडलेल्या लाईनची डागडुजी वेळेत करता आली नाही.
१.७८ लाखांच्या ३,४५० मीटर अॅल्युमिनिअम तारा व केबल पोलिसांकडून जप्त
या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद पडलेल्या लाईनवरील तब्बल ३,४५० मीटर लांबीची १०० एसक्यू एमएम जुनी अॅल्युमिनिअम तार, १,३५० मीटर लांबीची ५५ एसक्यू एमएम वापरती अॅल्युमिनिअम तार आणि अग्नी प्रतिरोधक एच पाईप चॅनेल असा एकूण १ लाख ९९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून वेगाने तपास सुरू केला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढून दोन जणांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी महावितरणच्या विजेच्या तारा चोरल्याची कबुली दिली.
या धडक कारवाईत पोलिसांनी रंजित ऊर्फ बल्ला शिवपूजन निषाद (वय २६, रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारशाह) आणि मुन्ना ऊर्फ लंगडा संतोष रामकृपाल निषाद (वय ३२, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारशाह) या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांच्याकडून १ लाख ४८ हजार रुपये किमतीची ३,४५० मीटर अॅल्युमिनिअम तार, २४ हजार ३०० रुपयांची १,३५० मीटर ५५ एसक्यू एमएम तार आणि ६ हजार रुपये किमतीची ११५ फूट केबल तार असा एकूण १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राजुरा पोलीस ठाण्यातील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर तुमराम, पोलीस हवालदार विक्की निर्वाण, अनुप डांगे, तसेच पोलीस अंमलदार शफीक शेख, महेश बोलगोडवार, मिलिंद जांभुळे आणि रमेश बस्सी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






