Bhisi Wire Theft Case Accused Arrested By Police

भिसी येथे कृषी पंपांच्या तारा चोरणाऱ्या आंतर-टोळीचा पर्दाफाश; ३ आरोपींना अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 25, 2026

भिसी / चंद्रपूर: Bhisi Wire Theft Case मध्ये भिसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी टिटवी शेतशिवारातून कृषी पंपांच्या वीज तारा चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपीसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोन भंगार दुकानदारांना अटक करण्यात आली आहे. (हे हि वाचा – शेतमजुराचा माय लेकीवर हल्ला)

Bhisi Wire Theft Case : भिसी पोलिसांची टिटवी शिवारात धडक कारवाई

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा करणाऱ्या ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या आंतर-टोळीवर भिसी पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. टिटवी शेतशिवारातून चोरीला गेलेल्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या तारांसह चोरीत वापरलेली वाहने असा एकूण ७ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणात एका मुख्य आरोपीसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोन भंगार दुकानदारांना अटक करण्यात आली आहे.

कृषी पंपांच्या २१ स्पॅन ॲल्युमिनियम तारांची चोरी कशी झाली?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिमूर तालुक्यातील भिसी वीज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या मौजा टिटवी शेतशिवारात कृषी पंपांना जोडणाऱ्या २१ स्पॅन इलेक्ट्रिक सप्लायच्या ॲल्युमिनियम तारा (किंमत १ लाख ५१ हजार रुपये) अज्ञात चोरट्यांनी १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६ दरम्यान कापून लंपास केल्या होत्या. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता कृपाल महादेव लांजे (वय ४०) यांच्या तक्रारीवरून भिसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच भिसी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पारडपार येथील मनीष ऊर्फ चंद्रभान सुभाष वाकडे (वय २९) आणि त्याचा साथीदार सोमेश्वर चौधरी यांनी या तारा चोरल्याचे निष्पन्न झाले. या चोराने जांभूळघाट येथील स्वप्निल सुनील हजारे (वय २०) आणि कुणाल गणेश हजारे (वय १९) यांच्या भंगार दुकानात या चोरीच्या तारा विकल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनीष वाकडे याच्यासह भंगार खरेदी करणारे स्वप्निल हजारे आणि कुणाल हजारे या तिघांना २० ऑगस्ट रोजी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपींना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली होती, तर सध्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात चोरी गेलेल्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या २१ स्पॅन ॲल्युमिनियम तारा, गुन्ह्यात वापरलेले ५ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन आणि ५० हजार रुपयांची स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ७ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी सोमेश्वर काशिनाथ चौधरी (रा. पारडपार) याच्या शोधासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि सर्वेश बेलसरे, भिसीचे ठाणेदार सपोनि मंगेश भोंगाडे, पोहवा नितीन कुरेकार, प्रमोद कोटनाके, अमोल सावे, गजानन मडावी तसेच भिसी पोलीस स्टेशनचे स.फौ. बाळकृष्ण जिभकाटे, पोहवा सुनील घोडमारे, पोअं सतीश झिलपे, मंगेश चौधरी व वैभव गोहणे यांनी पार पाडली. या कारवाईमुळे परिसरातील शेती साहित्याची चोरी करणाऱ्या चोरांचे धाबे दणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment