राजुरा (चंद्रपूर): Rajura Police Ganja Smuggling तेलंगणा राज्यातून दुचाकीवरून बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना राजुरा पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई ८ ऑगस्ट २०२६ रोजी नाकेबंदी दरम्यान करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ९५० ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सीमावर्ती भागातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. (हे हि वाचा – जंगलात रंगला जुगार, २० जणांवर गुन्हे दाखल)
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राजुरा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली होती की, तेलंगणा पासिंगच्या एका दुचाकीवरून दोन इसम गांजा हा अंमली पदार्थ घेऊन राजुरा शहरात वाहतूक करणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यातील सर्व नियमांचे तंतोतंत पालन करत तात्काळ नाकेबंदी केली. संशयित हिरो एच.एफ. डिलक्स दुचाकी (क्रमांक TS 20 C 1109) येताच पोलिसांनी तिला थांबवून झडती घेतली.
संशयितांच्या ताब्यातील मोरपंखी रंगाच्या बॅगची पाहणी केली असता, त्यात हिरव्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये खाकी सेलोटेपने गुंडाळलेला पाने, फुले, बोंड आणि बिया असलेला ओलसर काळपट गांजा आढळून आला. पोलिसांनी ९५० ग्रॅम वजनाचा १८,००० रुपये किमतीचा गांजा, ५०० रुपयांची बॅग आणि वाहतुकीसाठी वापरलेली ८५,००० रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १,०३,५०० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी अशोक नागय्या माचर्ला (वय २५, रा. गुंडीरोड दसनापूर, आसिफाबाद) आणि विष्णू महेश नागापुरी (वय २०, रा. टी.आर. नगर, आसिफाबाद, तेलंगणा) या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कलम ८(क), २०(ब), २२(ब) NDPS Act अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुराचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर तुमराम, पोलीस हवालदार विक्की निर्वाण, अनुप डांगे, तसेच पोलीस अंमलदार महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांच्या पथकाने पार पाडली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






