चंद्रपूर: Chandrapur Jungle Gambling Raid चंद्रपूर शहरातील टॉवर टेकडी परिसरातील घनदाट जंगलात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल जुगार अड्डयावर रामनगर पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई केली आहे. वन्यजीवांची भीती आणि गडद अंधाराची पर्वा न करता पोलिसांनी वेशांतर करून या अड्डयाला चारही बाजूंनी वेढा घातला. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ४० लाख ४ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून २० हून अधिक जुगारांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. (हे हि वाचा – पोलिसांना पाहताच वळवली गाडी, पाठलाग करून केली अटक)
वन्यप्राण्यांची भीती अन् अंधार: पोलिसांचे वेशांतर
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांना टॉवर टेकडीमागील जंगलात ५२ ताश पत्त्यांवर कट पत्त्याचा हार-जीतचा मोठा जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. जुगाराचे हे ठिकाण निसर्गाच्या कुशीत अगदी दुर्गम भागात, काटेरी झाडाझुडपांच्या मध्यभागी होते. तेथे पोहोचण्यासाठी टॉवर टेकडीवरून एकच अतिशय अरुंद पायवाट होती. पोलीस गाडी किंवा साध्या वेशातील पथक त्या पायवाटेने गेल्यास जुगारी सावध होऊन पळून जाण्याची पूर्ण शक्यता होती. यावर तोडगा म्हणून रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या विशेष पथकाने अतिशय चतुर रणनीती आखली.
पोलीस पथकाने आपले नेहमीचे रूप बदलून वेशांतर केले आणि रात्रीच्या गडद अंधारात जंगलाला चहूबाजूने वेढा घातला. एका बाजूला वन्यप्राण्यांची भीती आणि दुसऱ्या बाजूला काटेरी वेली व झाडांचा अडसर असतानाही, पोलीस कर्मचाऱ्यांनी कसलाही आवाज न करता पायदळ पुढे सरकण्यास सुरुवात केली. रात्री साधारण १०:३६ वाजेच्या सुमारास संपूर्ण जंगलाला वेढा पूर्ण होताच पोलिसांनी अचानक या अड्डयावर छापा मारला. अचानक झालेल्या या छाप्याने जुगार खेळणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि पळापळ झाली. अंधाराचा फायदा घेऊन काही जण जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून घटनास्थळावरून सात जणांना जागीच रंगेहात पकडले.
रातच्या अंधारात वेढा आणि अचानक छापा: घटनास्थळावरून ७ जण रंगेहात अटक
या कारवाईत पोलिसांनी इम्रान खान रशीद खान (३३, रा. बाबुपेठ), अनिल पंढरीनाथ ढोंगडे (३९, रा. जुनोना चौक), सागर मुरली नागरे (३२, रा. रयतवारी कॉलरी), मन्सुर असरार अहमद (३२, रा. रयतवारी कॉलरी), अर्शद चांद शेख (३३, रा. बाबुपेठ), अमोल निलकंठ तडस (३८, रा. बाबुपेठ) आणि सुरेश पुनराज वावरे (५६, रा. बाबुपेठ) या सात जणांना ताब्यात घेतले. याशिवाय पळून गेलेल्या गुड्डू अंडेवाला, हरी पुंजारी, अमित माखन गुप्ता, जावेद शेख, भीमराव माउलीकर, सुरज उर्फ सुरा, वतन कांबळे, सादिक इराणी, राहुल कोमटी, येलन्ना मामीडवार, राज बब्बर, मुन्ना माधव मिश्रा, धनराज सावरकर आणि इतर दोन ते तीन संशयितांवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पसार झालेल्या जुगारांचा शोध पोलीस घेत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार अमोल गिरडकर, विनोद यादव, मिलिंद दोडके, आनंद खरात, राजू चिताडे, संदेश चुनारकर, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, शंकर भोयर, कन्हैया पवार, संदीप भोयर, अमरदीप वावरे, सुमेध मानकर, रवींद्र वाभीतकर, सुनील गायके, प्रदीप कुळमेथे आणि शैलेंद्र सेलोटे व रामनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






