गडचांदूर (जि. चंद्रपूर): Amalnala Dam Green Water चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अमलनाला धरणातील पाण्याचा रंग अचानक हिरवट झाल्याने गडचांदूर शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. धरणातील पाण्याचा रंग बदलल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे आवाहन गडचांदूर नगरपरिषदेने केले आहे. या घटनेमुळे सुमारे ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (हे हि वाचा – ११७ कामगारांच्या घरात आनंद)
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी सुमारे सात वर्षांपूर्वी अमलनाला धरणातील पाणी अशाच प्रकारे हिरवे पडले होते. मात्र, त्या काळात या धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने सिंचन आणि स्थानिक उद्योगांसाठीच केला जात होता. परंतु, वर्ष २०२२ पासून याच धरणातून सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहराला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे थेट पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या धरणाचा रंग बदलल्याने ५० हजारांहून अधिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाण्याचा रंग हिरवा का झाला? त्यामागे शेवाळाची (Algae Bloom) निर्मिती आहे की रासायनिक प्रदूषण? तसेच हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, याबाबत आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नगरपरिषदेने सावधगिरीचा उपाय म्हणून तत्काळ पाणी पुरवठ्याबाबत सूचना जारी केल्या असल्या, तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
दरम्यान, धरणातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, पाण्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पाण्याचा रंग बदलण्याचे नेमके कारण समोर येणार आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य उपाययोजना करावी आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा, अशी जोरदार मागणी गडचांदूरकरांकडून केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






