चंद्रपूर – Chandrapur Farmer Agriculture Award संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. राज्यस्तरावर पार पडलेल्या पीक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण नऊ शेतकऱ्यांनी विविध पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे या नऊ पुरस्कारांपैकी तब्बल सात पुरस्कार हे बल्लारपूर मतदारसंघातील पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिळवले आहेत. (हे हि वाचा – इंस्टाग्राम वर रीळ बनवा व जिंका २५ हजार रुपये, जाणून घ्या)
शेतकऱ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पोंभूर्णा तालुक्यातील सात शेतकऱ्यांचे राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सुवर्णयश
राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी तब्बल सात पुरस्कार हे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पटकावले आहेत. काही शेतकऱ्यांनी प्रथम, काहींनी द्वितीय तर काहींनी तृतीय क्रमांक मिळवत आपल्या कष्टाची आणि शेतीतील गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल घ्यायला भाग पाडले आहे. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कष्टाला राज्यस्तरीय सन्मान मिळणे हा माझ्यासाठी केवळ आनंदाचा नव्हे, तर गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, अशी भावना राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त करत पुरस्कार प्राप्त नऊ शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहेत.
हरभरा आणि जवस पिकात चक खापरीच्या शेतकऱ्यांची बाजी
या राज्यस्तरीय यशामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चक खापरी येथील श्री. सुंदरशहा सोनू जुमनाके, श्री. लीलाराम उद्धव पिदुरकर, श्री. तुळशीराम भिवाजी मोरे, श्री. यशवंत विश्वनाथ काळे, श्री. हरिश्चंद्र आनंदऱाव कोडापे, श्री. तुळशीराम गोसाई जुमनाके आणि श्रीमती कुसुमबाई आनंदऱाव कोडापे या सात शेतकऱ्यांचा समावेश आहे. यांनी हरभरा आणि जवस या पिकात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला असून या सर्वांच्या कष्टाला आणि शेतीतील उल्लेखनीय कामगिरीला राज्याने दिलेली ही पावती संपूर्ण बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासाठी अभिमानाची बाब आहे.
शेतकऱ्याच्या शेतातील पीक जेव्हा राज्यस्तरावर गौरवले जाते, तेव्हा त्या पुरस्कारामागे केवळ उत्पादनाची गुणवत्ता नसते; त्यामागे त्या शेतकऱ्याचा घाम, कुटुंबाची साथ, अनेक महिन्यांची मेहनत आणि शेतीप्रती असलेली निष्ठा असते. माझ्या मतदारसंघातील सात शेतकऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे हा सन्मान त्यांच्यासाठी जितका आनंदाचा आहे, तितकाच माझ्यासाठीही गौरवाचा आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची ही कामगिरी म्हणजे केवळ पुरस्कारांची संख्या नाही, तर या भागातील शेतीची क्षमता आणि शेतकऱ्यांची गुणवत्ता अधोरेखित करणारी बाब आहे. प्रतिकूल परिस्थितीतही नवनवीन प्रयोग, मेहनत आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या माध्यमातून शेतकरी राज्याच्या कृषी क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.राज्यस्तरीय पीक स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बल्लारपूर विधानसभेतील शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेला हा सन्मान म्हणजे माझ्या मतदारसंघाच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे. भविष्यातही शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे राज्यात आणि देशात बल्लारपूर मतदारसंघाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभा आहो,असा विश्वासही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






