चंद्रपूर – Soil Water Conservation Contest आणि ‘वॉक फॉर वॉटर’ महा वॉकेथॉनचे आयोजन मृद व जलसंधारण विभागातर्फे १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये जल व मृद संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि तरुणांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाने केले आहे.
१५ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी इन्स्टाग्राम रील स्पर्धा
रील स्पर्धा 15 ते 21 ऑगस्टदरम्यान : रील स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकाचे वय 15 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. प्रत्येक स्पर्धकाने 30 ते 60 सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करावी. रीलच्या सुरुवातीला उद्देश, सहभागीचे पूर्ण नाव व जिल्हा नमूद करणे आवश्यक आहे. सहभागीच्या स्वतःच्या Public Instagram Account वरूनच रील पोस्ट करावी लागणार असून मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्याला टॅग करणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग अनिवार्य असून रील अपलोड करण्याचा कालावधी 15 ते 19 ऑगस्ट 2026 असा आहे. एक स्पर्धक जास्तीत जास्त तीन रील अपलोड करू शकतो. मात्र, स्पर्धेत केवळ सर्वाधिक मूल्यांकन मिळालेली रील ग्राह्य धरली जाईल. रीलमधील मजकूर मृद व जलसंधारणाशी संबंधित असावा. तसेच इतर नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करता येईल. रीलमध्ये मृद व जलसंधारणाचा स्पष्ट आणि प्रभावी संदेश असणे आवश्यक आहे.
100 गुणांच्या आधारे होणार मूल्यांकन : स्पर्धेचे मूल्यांकन विषय व संदेशासाठी 30 गुण, कल्पकतेसाठी 25 गुण, प्रभावी सामाजिक संदेशासाठी 20 गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्तेसाठी 15 गुण आणि Instagram Engagement साठी 10 गुण अशा एकूण 100 गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. केवळ Likes किंवा Followers वरून विजेता निश्चित केला जाणार नसून तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement या दोन्हींचा समतोल विचार केला जाईल.
जिल्हास्तरावरील विजेत्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल. विजेत्यांचा सन्मान 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र युवा जलदूत या नावाने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात येणार आहे.
२१ ऑगस्ट रोजी रंगणार ‘वॉक फॉर वॉटर’ महा वॉकेथॉन
21 ऑगस्टला ‘वॉक फॉर वॉटर’ महा वॉकेथॉन : जलसंधारणाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी 21 ऑगस्ट 2026 रोजी ‘वॉक फॉर वॉटर’ महा वॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी प्रत्येक सहभागीने QR Code च्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी वयोमर्यादा नसून सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकतात. प्रत्येक सहभागी व्यक्तीस टी-शर्ट, कॅप, मृद जलदूत बॅज आणि ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महा वॉकेथॉनच्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी आगमन, सकाळी 6.15 वाजता वॉर्मअप, सकाळी 6.45 वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि सकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात येईल. सकाळी 8 वाजता महा वॉकेथॉनचा समारोप होईल, तर सकाळी 8.30 वाजता संदेश, पुरस्कार वितरण व आभार कार्यक्रम होणार आहे.
रील स्पर्धा तसेच महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्यूआर कोड द्वारे नोंदणी करावी आणि मृद व जलसंधारणाच्या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांनी केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






